अनुदानासाठी वडिलांचा खून
By admin | Published: June 5, 2014 09:53 PM2014-06-05T21:53:43+5:302014-06-05T22:47:25+5:30
गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदानाच्या पैशांवरून पोटच्या दोन मुलांनीच बापाला मारहाण करून त्यांना जीवे मारण्याचा धक्कादायक प्रकार मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द येथे उघडकीस आला आहे.
गारपिटीच्या अनुदानासाठी वडिलांचा खून !
सोलापूरमधील घटना : पोटच्या मुलांची बापाला लाथाबुक्क्यांनी मारहाण
सोलापूर : गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदानाच्या पैशांवरून पोटच्या दोन मुलांनीच बापाला मारहाण करून त्यांना जीवे मारण्याचा धक्कादायक प्रकार मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द येथे उघडकीस आला आहे.
भगवान मारुती कांबळे (वय ७२, रा. कामती खुर्द, ता. मोहोळ) असे या दुर्दैवी वृद्ध शेतकर्याचे नाव आहे. कामती येथे त्यांची शेतजमीन आहे. कांबळे यांना तीन मुले आहेत. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे त्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. शासनाने पंचनामे करून शेतकर्यांना भरपाई देण्याची योजना आणली. गारपीट योजनेचे अनुदान भगवान कांबळे यांच्या बँकेतील खात्यावर जमा झाले. अनुदानाचे पैसे आल्याचे समजताच त्यांच्या मुलांमध्ये भांडणे सुरू झाली. २८ मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता दत्तात्रय व संजय या दोघांनी कांबळे यांच्याकडे अनुदानाच्या पैशांची मागणी केली. यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. कांबळे यांनी दोघांनाही पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या दत्तात्रय व संजय या दोघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात ते बेशुद्ध झाले. वडील निपचित पडल्याचे पाहून दोघांनी पळ काढला. तिसरा मुलगा विजय याने कांबळे यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना ५ जून रोजी दुपारी तीन वाजता त्यांच्या मृत्यू झाला. सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली. (प्रतिनिधी)