मदतीसाठी वडिलांची वणवण
By admin | Published: June 7, 2017 02:34 AM2017-06-07T02:34:31+5:302017-06-07T02:34:31+5:30
वंशाचा दिवा म्हणून दोन्ही मुलांना लाडा-कौतुकाने वाढविले, मात्र त्याच मुलांनी ७० वर्षांच्या वृद्ध आई-वडिलांना घराबाहेर काढले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वंशाचा दिवा म्हणून दोन्ही मुलांना लाडा-कौतुकाने वाढविले, मात्र त्याच मुलांनी ७० वर्षांच्या वृद्ध आई-वडिलांना घराबाहेर काढले. आजारी आईला मुलीने आधार दिला. मात्र ७० वर्षांचे वृद्ध वडील अजूनही रस्त्यावर जीवन जगत असल्याची मन हेलावून टाकणारी घटना भांडुपमध्ये उघडकीस आली आहे. आता या वृद्धाने मदतीसाठी पुन्हा भांडुप पोलिसांकडे धाव घेतली.
भांडुप पश्चिमेकडील फरिदनगर परिसरात ७० वर्षांचे राधेश्याम पाठक पत्नी लालतीदेवी, दोन मुलांसोबत राहायचे. मुलगा राकेशकुमार आणि विनोदकुमार दोघेही चालक म्हणून काम करतात. तर मुलीचे लग्न झाले आहे. मुलांच्या लग्नानंतर काही वर्षांतच त्यांना आई-वडिलांची अडचण वाटू लागली. त्यांनी अडीच वर्षांपूर्वी दोघांनाही मारहाण करून त्यांना घराबाहेर काढले. अशावेळी आजारी असलेल्या लालतीदेवी यांना रस्त्यावर आलेल्या पाठक यांनी रुग्णालयात दाखल केले. तिचा खर्च उचलण्यासाठी खिशात पैसे नाहीत. मुलांच्या भवितव्यासाठी जमवलेली पुंजी खर्च केली. अशावेळी नेहमी दुर्लक्ष केलेली मुलगी आई-वडिलांचा आधार ठरली. अडीच वर्षे तिने दोघांनाही आधार दिला.
मुलीच्या सासरी आणखी किती दिवस राहायचे म्हणून पाठक पुन्हा मुलांकडे निघून आले. मात्र तेथे परिस्थिती जैसे थेच होती. मुलांनी मंगळवारी पुन्हा पाठक यांना धक्के मारून घराबाहेर काढले. त्यांनी थेट भांडुप पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तसेच मुलांकडून होत असलेल्या अत्याचाराबाबत एक व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला.
>आता मला न्याय हवा
‘हक्काचे घर असतानाही मुलांकडून रस्त्यावर राहण्याची वेळ ओढावली आहे. आतापर्यंत पाच ते सहा वेळा भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र त्यांना तात्पुरती समज दिल्यानंतर परिस्थिती जैसे थे आहे. महिन्याला मिळणारे अडीच हजार रुपये पत्नीच्या औषधासाठी खर्च होतात. मुले असे वागतील असे स्वप्नातही वाटले नव्हते. मुले आणि सुना जिवावर उठल्या आहेत. मात्र आता मला न्याय हवा आहे,’ असे पाठक यांनी सांगितले.