क्षुल्लक कारणावरून वडिलांची हत्या
By admin | Published: March 24, 2017 04:13 PM2017-03-24T16:13:10+5:302017-03-24T16:13:10+5:30
क्षुल्लक कारणावरून वडिलांची हत्या केल्यानंतर एका नराधमाने पत्नी आणि आईवरही हल्ला चढवला. त्यांना जखमी केल्यानंतर स्वत:ची दोन लहान मुले घेऊन जंगलात पळून गेला.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 24 : क्षुल्लक कारणावरून वडिलांची हत्या केल्यानंतर एका नराधमाने पत्नी आणि आईवरही हल्ला चढवला. त्यांना जखमी केल्यानंतर स्वत:ची दोन लहान मुले घेऊन जंगलात पळून गेला. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री घडलेल्या या थरारक घटनेने परिसरात रात्रभर शोकसंतप्त वातावरण होते. पोलिसांंनी रात्रभर आरोपीचा शोध घेऊन शुक्रवारी भल्या सकाळी आरोपीच्या मुसक्या बांधल्या.
उमेश ठमाजी गयाळी (वय ३२) असे या नराधमाचे नाव आहे. वानाडोंगरीतील (हिंगणा)वायसीसी कॉलेजमागे असलेल्या सप्तश्रृंगी मंदीराजवळ (रामनगर) त्याचे घर आहे. बोेलरोवर चालक म्हणून काम करणारा उमेश दारुडा आणि भांडखोर वृत्तीचा आहे. छोट्या - छोट्या कारणावरून घरी आणि बाहेरच्ुया लोकांशी तो नेहमीच वाद घालतो.
गुरुवारी रात्री ११.३० च्या सुमारास तो दारूच्या नशेत तर्र होऊन बडबड करू लागला. त्याचे वडील ठमाजी सटवाजी गयाळी (वय ७०) यांनी त्याला गप्प राहण्यास सांगितले असता त्याने वडीलांशी वाद सुरू केला. नंतर बाजुची लाकडी फळी उचलून त्याने वडिलांच्या डोक्यावर फटके मारले. त्यामुळे वृद्ध ठमाजी रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. ते पाहून आरोपीची आई लक्ष्मीबाई (वय ६५) आणि पत्नी नंदा (वय ३०) या दोघी आरोपीला पकडण्यासाठी धावल्या. उमेशने त्यांनाही जोरदार मारहाण केली. त्या जीवाच्या आकांताने आरडाओरड करू लागल्याने शेजारी धावले. ते पाहून आरोपीने त्याच्या दुर्गेश (वय ७) आणि आदेश (वय ९) या मुलांना मारहाण करीत उचलले आणि शेजा-यांना धाक दाखवत आरोपी पळून गेला.
रात्रभर धाकधूक
भांडणखोर उमेशने वृद्ध वडिलांची हत्या केल्याचे आणि आई तसेच पत्नीला गंभीर जखमी केल्याचे कळताच परिसरात खळबळ उडाली. मोठ्या संख्येत नागरिक घटनास्थळी जमले. माहिती कळताच एमआयडीसी पोलीस आणि गुन्हेशाखेचा ताफाही पोहचला. आरोपीच्या ताब्यात त्याची दोन छोटी मुले असल्याने आणि तो त्यांच्याही जीवाला धोका पोहचवू शकतो, हे ध्यानात आल्यामुळे नागरिकांसोबत पोलिसांच्या मनातही धाकधूक होती. त्यामुळे आरोपीचा रात्रभर शोध घेण्यात आला. आज भल्या सकाळी तो हिंगणा परिसरात आढळताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या बांधल्या आणि दुर्गेश तसेच आदेशला त्याच्या तावडीतून सोडविले. आरोपीविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, मुलांचे अपहरण आदी आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.