पित्याने आवळला नवजात मुलीचा गळा?
By admin | Published: October 7, 2016 05:50 AM2016-10-07T05:50:55+5:302016-10-07T05:55:12+5:30
नवरात्रौत्सवात सर्वत्र स्त्रीशक्तीचा जागर सुरू असताना यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात मात्र क्रौर्याने परिसीमा गाठली
यवतमाळ : नवरात्रौत्सवात सर्वत्र स्त्रीशक्तीचा जागर सुरू असताना यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात मात्र क्रौर्याने परिसीमा गाठली. जन्माला आलेल्या जुळ््या मुलींपैकी एकीचा त्यांच्या पित्यानेच गळा आवळून जीव घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उमरखेड तालुक्याच्या चिल्ली येथील एक महिलेने सोमवारी पहाटे ६.१५ वाजता जुळ्या मुलींना जन्म दिला. पहिल्यांदा जन्माला आलेल्या मुलीचे वजन कमी होते. तिला बालरोग विभागातील अतिदक्षता कक्षात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र पित्याने तिला उपचारासाठी नेण्यास नकार दिला. तसे लेखीही डॉक्टरांना दिले.
सोमवारी रात्री वजनाने कमी असलेल्या मुलीला नर्सने बालरोग विभागात नेण्याचा सल्ला दिला. तेव्हा पिता आणि आजी त्या मुलीला घेऊन बालरोग विभागात गेले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्या चिमुकलीला मृत घोषित केले. चिमुकलीचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले. त्यावरून शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला असला तरी आरोपी मात्र निश्चित केला नाही. जन्मदात्यांवरच पोलिसांचा संशय असून पाठोपाठ झालेल्या मुलींमुळेच हे कृत्य केल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस आले आहेत. (प्रतिनिधी) मुलगी झाल्याने विवाहितेचा खून
कसबे तडवळे (जि. उस्मानाबाद) : मुलगी झाल्याच्या कारणावरून एका विवाहितेचा गळा अवळून खून केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरूध्द ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही खळबळजनक घटना बुधवारी उस्मानाबाद तालुक्यातील गोपाळवाडी शिवारातील सटवाई खोरी पारधी पिढीवर घडली़
शीतल शंकर काळे (२०) हिला तिचे सासरे धनु गोर्वधन काळे, पती शंकर व नणदेचा नवरा सुखदेव शिवाजी पवार हे सतत शारीरिक, मानसिक जाच करीत होते़ मुलगी झाली म्हणून बुधवारी रात्री ८च्या सुमारास या तिघांनी दोरीने गळा अवळून शीतलचा खून केल्याची फिर्याद कल्याण भीमराव शिंदे यांनी ढोकी पोलीस ठाण्यात दिली़ त्यानंतर पोलिसांनी तिघांनाही गजाआड केले आहे़