वडिलांचे अनोखे दातृत्व

By admin | Published: November 10, 2014 01:07 AM2014-11-10T01:07:43+5:302014-11-10T01:07:43+5:30

होळीचा आनंदाचा सण. त्याच दिवशी तो मोटारसायकलवरून खाली पडला. डोक्याला जबर मार लागला. त्याला लागलीच इस्पितळात भरती केले. सात दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते.

Father's unique grandfather | वडिलांचे अनोखे दातृत्व

वडिलांचे अनोखे दातृत्व

Next

मुलाचे अवयव केले दान : दोघांना मिळाले जीवनदान तर दोघांना दृष्टी
नागपूर : होळीचा आनंदाचा सण. त्याच दिवशी तो मोटारसायकलवरून खाली पडला. डोक्याला जबर मार लागला. त्याला लागलीच इस्पितळात भरती केले. सात दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. मुलगा बरा होईल, या आशेवर आईवडिल होते. परंतु आठव्या दिवशी डॉक्टरांनी ‘ब्रेनडेड’ घोषित केले. आईचा आक्रोश थांबत नव्हता. वडिलांचाही धीर खचला होता, पण आपला मुलगा जिवंत आहे, ही जाणीव त्यांना सातत्याने होत होती. स्वत:ला सावरत एक निर्णय घेतला, आपल्या मुलाचे अस्तित्त्व कायम ठेवण्याचा तो निर्णय होता. पत्नीची समजूत काढली. डोळे, किडनी दान केले. त्यांच्या या निर्णयामुळे दोघांना जीवनदान तर दोघांना नवी दृष्टी मिळाली.
एअर डिफेन्स रेजिमेंटचे निवृत्त हवालदार संजयकुमार सिंग त्या वडिलाचे नाव. त्यांच्या या अनोख्या दातृत्वाचा सत्कार जिल्हा माजी सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाच्यावतीने रविवारी ११८ बटालियन आर्मी येथे करण्यात आला. यावेळी त्यांची पत्नी आरती सिंग उपस्थित होत्या.
संजयकुमार आणि आरती सिंग यांचा १८ वर्षीय मुलगा अमित हा २७ मार्च २०१३ होळीच्या दिवशी मित्रांना भेटायला मोटारसायकलने निघाला. मात्र, काही वेळातच तो रस्त्यावर पडून असल्याचा निरोप आला. त्याला लागलीच जवळच्या इस्पितळात आणि नंतर छिंदवाडा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने आणि डोक्याला जबर मार लागल्याने तेथून त्याला नागपुरातील एका खासगी इस्पितळात हलविण्यात आले.
संघर्ष संपला पण संयम नाही
नागपूर : अचानक झालेल्या या घटनेने सर्वच हादरून गेले होते. बेशुद्ध अवस्थेत अमितवर सात दिवस उपचार चालले. तो बरा होईल या आशेवर आईवडिल होते. परंतु आठव्या दिवशी डॉक्टरांनी मेंदूत रक्तस्राव झाल्याचे सांगून ब्रेनडेड घोषित केले. त्याच्या सर्व अवयवांचे कार्य सुरू होते. व्हेंटिलेटरवर आणखी काही दिवस ठेवून पाहता येईल, असेही डॉक्टरांचे म्हणणे होते. या धक्क्यातून सावरत वडिलांनी खचून न जानता संयमाने अवयवदानाचा निर्णय घेतला.
मात्र, हा निर्णय अमितच्या आईला सांगतांना त्यांना मनाची खूप तयारी करावी लागली. पण ती माताही समजली. मुलाची किडनी, डोळे या अवयवाचे दान करायास तिने होकार दिला. या निर्णयाने त्या दाम्पत्याने एक नवीन आदर्श समाजासमोर ठेवला. दुसऱ्याच दिवशी अमितची किडनी अत्यंत गरजू असलेल्या एका २० वर्षीय मुस्लिम मुलीला आणि एका पोलिसाला देण्यात आली तर इतर दोघांना नेत्रदान करून त्यांना नवी दृष्टी दिली.
त्यांच्या या कार्याची प्रेरणा इतरांना मिळावी म्हणून जिल्हा माजी सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित माजी सैनिकांच्या मेळाव्यात मोहन फाऊंडेशनच्या सहकार्याने या दाम्पत्याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा माजी सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाचे लखन पांडे, कर्नल राजेश, सीओ यश राठोड व मोहन फाऊंडेशनचे नागपूरचे संचालक डॉ. रवि वानखेडे उपस्थित होते. ‘माझा मुलगा अमित आजही अवयव रूपात जिवंत आहे’, संजयकुमार सिंग यांच्या या वाक्याने उपस्थित सर्व माजी सैनिकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. त्यावेळी त्या दोघांच्या डोळ्यात अश्रू होते.

Web Title: Father's unique grandfather

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.