दहशतवादी कारवायांपासून दूर राहण्याचा फतवा कधीच जारी होत नाही - उद्धव ठाकरे

By admin | Published: March 16, 2017 07:49 AM2017-03-16T07:49:57+5:302017-03-16T07:52:38+5:30

सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम समाजाच्या दुर्देशेवर भाष्य करत फतव्यांवरुन संताप व्यक्त केला आहे

Fatwa is never released from terrorist activities - Uddhav Thackeray | दहशतवादी कारवायांपासून दूर राहण्याचा फतवा कधीच जारी होत नाही - उद्धव ठाकरे

दहशतवादी कारवायांपासून दूर राहण्याचा फतवा कधीच जारी होत नाही - उद्धव ठाकरे

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - मुस्लिम गायिका नाहीदा आफरीनला जारी करण्यात आलेल्या फतव्यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सणसणीत टीका करत असे फतवे काढणाऱ्या मौलवींच्या मुसक्या आवळून त्यांना एकदा हिंदुस्थानची राज्यघटना शिकवावीच लागेल असं म्हटलं आहे. सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम समाजाच्या दुर्देशेवर भाष्य करत फतव्यांवरुन संताप व्यक्त केला आहे. 
 
मुस्लिम समाजाची दुर्दशा, निरक्षरता याविरुद्ध कधी मौलवींनी फतवे जारी केल्याचे ऐकिवात नाही. दहशतवादी कारवायांपासून दूर रहा, असा शहाणपणाचा सल्ला देणारा फतवाही कधी जारी होत नाही. नाहीद आफरीनसारखी नवोदित गायिका किंवा महिलांवरच तालिबानी फतव्यांच्या कुऱ्हाडी कोसळत असतात. असे फतवे काढणाऱ्या मौलवींच्या मुसक्या आवळून त्यांना एकदा हिंदुस्थानची राज्यघटना शिकवावीच लागेल! अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
 
(ISIS विरोधात गायल्याने 16 वर्षांच्या गायिकेविरोधात 46 मौलानांचा फतवा)
 
मुस्लिम मौलवींकडून उठसूट जारी केले जाणारे फतवे ही आपल्या देशात एक डोकेदुखीच होऊन बसली आहे. कुणीही मुल्ला उठतो आणि कुराण व शरीयतचा आधार घेऊन वाट्टेल तो फतवा जारी करतो. पुन्हा असे बेलगाम फतवे जारी करणा-या धर्मांधांवर कुणाचे नियंत्रणही उरलेले नाही. आता एक ताजा फतवा आसाममधून निघाला आहे. नाहीद आफरीन या सोळा वर्षांच्या नवोदित गायिकेविरुद्ध आसामातील धर्मांध मौलवी षड्डू ठोकून एकत्र आले आहेत. एक-दोन नव्हे तर आसामातील तब्बल 46 मौलवींनी या गाणेबंदीच्या फतव्यावर स्वाक्षऱया केल्या आहेत. दहावीत शिकणाऱया एका अल्लड वयातील मुलीचा गोड ‘गळा’ दाबण्याचा अधिकार या धर्मांधांना कोणी दिला? एका निरागस मुलीविरुद्ध एवढय़ा मोठय़ा संख्येने मुस्लिम मौलवींनी एकत्रित येऊन तिच्याविरुद्ध फतवा जारी करावा ही कुठली मर्दुमकी म्हणायची? असे संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी विचारले आहेत. 
 
इस्लामच काय, कुठल्याही धर्माची अशी शिकवणदेखील असू शकत नाही. अर्थात, खुद्द नाहीदने मात्र हा फतवा धुडकावून लावला आहे. ‘मी तर गाणारच’ असे तिने या धर्मांधांना ठणकावून सांगितले आहे. धर्मांधांविरुद्ध दोन हात करायला सज्ज झालेल्या नाहीदला जपण्याची जबाबदारी आता सरकारबरोबरच समाजाचीही आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
फतव्यावर स्वाक्षऱया करणाऱ्या ४६ मौलवींपैकी मूळ आसामी किंवा हिंदुस्थानी मौलवी किती आहेत आणि बांगलादेशी मौलवी किती हेदेखील आता बघायला हवे. मुळात हे फतवे जारी करणारे कोणीही असोत, ते एका अर्थाने समाजद्रोही आणि धर्मद्रोहीच म्हणायला हवेत. कायद्याच्या राज्यात आणि लोकशाही व्यवस्थेत अशा प्रकारे फतवे जारी करणे, हेच मुळात बेकायदेशीर आहे. मुस्लिम समाजात एक प्रकारे समांतर न्यायव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी या फतव्यांचा वापर होत आला आहे. अशी तालिबानी फर्माने सोडणाऱ्या मौलवींना पकडून त्यांना कठोर शासन केल्याशिवाय असे प्रकार थांबणार नाहीत असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं आहे. 
 
कधी महिलांनी फेसबुक वापरण्याविरुद्ध फतवा, कधी मॉडेलिंगविरुद्ध, कधी गर्भनिरोधके वापरण्यावरून, कधी नोकरीच्या ठिकाणी काम करताना परपुरुषांशी  बोलण्याविषयी, हे सगळे फतवे बहुतांश महिलांविरोधीच. महिलांनी कोणते कपडे घालावेत, काय खावे, कसे चालावे, कसे वागावे इथपासून तलाकपर्यंत फतवेच फतवे! मध्यंतरी तर एका मुस्लिम महिलेवर सासऱ्याने बलात्कार केला म्हणून सासऱ्यालाच नवरा मानण्याचा फतवा त्या पीडित महिलेवर बजावण्यात आला अशी उदाहरणं देत उद्धव ठाकरेंनी टीकेची झोडच उठवली.

Web Title: Fatwa is never released from terrorist activities - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.