तरुणीवर फौजदाराने केला अतिप्रसंगाचा प्रयत्न
By admin | Published: July 26, 2016 12:40 AM2016-07-26T00:40:01+5:302016-07-26T00:40:01+5:30
बलात्काराची तक्रार द्यायला गेलेल्या तरुणीवर एका फौजदाराने (एएसआय) अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उपराजधानीत घडली. अवघ्या पोलीस
नागपूर : बलात्काराची तक्रार द्यायला गेलेल्या तरुणीवर एका फौजदाराने (एएसआय) अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उपराजधानीत घडली. अवघ्या पोलीस दलासाठी लज्जास्पद ठरलेले हे प्रकरण एका महिला सामाजिक कार्यकर्त्यामुळे तब्बल दहा दिवसानंतर थेट पोलीस आयुक्तांकडे गेले. त्याची तातडीने दखल घेत आयुक्तांनी याप्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे अवघ्या पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे.
मूळची चंद्रपूर जिल्ह्यातील ही तरुणी सध्या नागपुरात राहते. गिट्टीखदानमध्ये राहून शिकणाऱ्या एका पोलीस पुत्राने प्रेमप्रकरणातून आपल्याशी शरीरसंबंध जोडले आणि नंतर दगाबाजी केली, असा आरोप करीत ती २९ जूनला गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवायला गेली. तेथे दुसऱ्या दिवशी तिची तक्रार नोंदवून घेण्यात आली. मात्र, तिचे समाधान झाले नाही. त्यामुळे ती १६ जुलैला दुसरी एक तक्रार घेऊन पोलीस आयुक्तालयात पोहोचली. यावेळी आयुक्तालयात अधिकाऱ्यांची बैठक सुरू असल्याने ती आतमध्ये प्रतीक्षालयात बसली. त्यावेळी तेथे एक पोलीस कर्मचारी होता. त्याने स्वत:चे नाव पटेल सांगितले. तिची विचारपूस केल्यानंतर येथे तक्रार देण्याऐवजी पोलीस उपायुक्तालयात तक्रार नोंदव, असा सल्ला दिला. आपण तिकडेच चाललो, तू माझ्यासोबत चलू शकते, असे सांगत त्याने तिला दुचाकीवर बसवले. मात्र, पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात जाण्याऐवजी त्याने तिला आपल्या घराकडे नेले. त्याने तिच्या गालाला हात लावताच त्याचे कलुषित मनसुबे तिच्या लक्षात आले. त्यामुळे तिने तेथून पळ काढला.
दरम्यान, हा प्रकार तरुणीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष नूतन रेवतकर यांना सांगितला. रेवतकर यांनी तिला सोमवारी सायंकाळी पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांच्याकडे नेले. आयुक्तांनी पीडित तरुणीची तक्रार ऐकून घेतल्यानंतर परिमंडळ २ च्या उपायुक्तांना कारवाईचे आदेश दिले.
कारवाईचे चक्र जोरात
एवढेच नव्हे तर सदरचे ठाणेदार मनोज सिडाम यांना या प्रकरणात तातडीने दोषी पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. थेट आयुक्तांनीच आदेश दिल्याने चौकशीची चक्रे वेगात फिरली. सदर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री १० च्या सुमारास पीडित तरुणीची तक्रार नोंदवणे सुरू झाले. तिकडे ह्यत्याह्ण पोलीस कर्मचाऱ्याची शोधाशोध सुरू झाली. त्याचे नाव पटेल नसून अल्ताफ आहे. तो कळमना ठाण्यात कार्यरत असल्याचेही स्पष्ट झाले. त्याच्याविरुद्ध वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.