फौजदारांची परीक्षा २१ ऑगस्टलाच होणार !
By admin | Published: August 11, 2016 05:00 PM2016-08-11T17:00:38+5:302016-08-11T17:00:38+5:30
फौजदारांच्या विभागीय मर्यादित परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नसून ही परीक्षा २१ ऑगस्टलाच घेतली जाईल, असे राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) गुरूवारी
Next
>ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. 11 - फौजदारांच्या विभागीय मर्यादित परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नसून ही परीक्षा २१ ऑगस्टलाच घेतली जाईल, असे राज्य लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) गुरूवारी स्पष्ट केले आहे.
फौजदारांच्या ८२८ जागांसाठी २१ ऑगस्ट रोजी राज्य लोकसेवा आयोगामार्फत विभागीय मर्यादित परीक्षा घेतली जात आहे. त्यासाठी राज्यातील तीन ते सहा वर्ष सेवा झालेल्या २५ हजार पोलीस कर्मचाºयांनी अर्ज केले आहेत. या परीक्षेची तयारी करता यावी म्हणून बहुतांश पोलीस कर्मचा-यांनी सुट्याही घेतल्या आहेत. मात्र बुधवारी मुंबई ‘मॅट’ने (महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण) या परीक्षेसाठी वयाची वाढीव मर्यादा (३८-४३) लागू असल्याचा अंतरिम निर्णय दिल्याने आता २१ ऑगस्टला परीक्षा होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु ही परीक्षा पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार २१ ऑगस्ट रोजीच घेतली जाणार असून त्यासाठी २५ हजार उमेदवार अर्थात पोलीस कर्मचा-यांना हॉल तिकीट पाठविण्यात आल्याचे राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा विभागाने ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे परिक्षेबाबतचा संभ्रम दूर झाला आहे.
म्हणे, ‘मॅट’चा आदेश मिळाला नाही...
फौजदार परीक्षा २१ ऑगस्टला होणार असली तरी ‘मॅट’ने बुधवारी दिलेल्या वाढीव वयोमर्यादेच्या अंतरिम आदेशावरील अंमलबजावणीचे काय? अशी विचारणा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा विभागाकडे केली असता ‘मॅट’चा आदेश अद्याप प्राप्त झाला नसल्याचे ‘लोकमत’ला सांगण्यात आले. हा आदेश प्राप्त झाल्यानंतर त्यात ‘मॅट’ने नेमके काय म्हटले आहे हे तपासले जाईल, त्याचा अभ्यास केला जाईल व शासनाला मार्गदर्शन मागितले जाईल, त्यानंतर अंमलबजावणीची दिशा ठरविली जाईल, असे सांगण्यात आले. लोकसेवा आयोगाची ही स्पष्टोक्ती पाहता वाढीव वयोमर्यादेचा लाभ २१ ऑगस्टच्या परीक्षेच्या दृष्टीने तातडीने देण्याच्या हालचाली नसल्याचे दिसून येते.