मुरुडमधील रस्त्यांची झाली बिकट अवस्था
By admin | Published: July 10, 2017 03:33 AM2017-07-10T03:33:01+5:302017-07-10T03:33:01+5:30
मुरुड तालुक्यातील जनता खराब रस्त्यांमुळे हैराण आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव/मुरुड : मुरुड तालुक्यातील जनता खराब रस्त्यांमुळे हैराण आहे. मुरुड ते साळाव व मुरु ड ते सावली या रस्त्यांची दुरवस्था झालेली असतानासुद्धा, लोक आंदोलन करूनही सार्वजनिक बांधकाम खाते दुर्लक्ष करीत असेल, तर लोकांसाठी आम्हीसुद्धा उपोषण करण्यास सज्ज आहोत. या खराब रस्त्यांमुळे महिलांच्या प्रसूती रिक्षांत झालेल्या आहेत. अनेक जणांना पाठीच्या दुखण्याने त्रस्त केले आहे. बांधकाम खात्याच्या अधिकारीवर्गाने येथे एकदा प्रवास करून बघावा आणि मगच सांगावे, लोकांचे म्हणणे चुकीचे आहे काय, हे त्यांनासुद्धा अवगत होईल. रस्ते दुरु स्त करा, अन्यथा राष्ट्रवादी पक्षाचा तालुका अध्यक्ष म्हणून मी लवकरच उपोषणास बसेन, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर यांनी तहसील कार्यालयात झालेल्या सभेत दिला आहे.
मुरु ड तालुक्यातील खराब रस्त्यांबाबत तहसीलदार उमेश पाटील यांच्या दालनात आगरदांडा, सावली व विक्र म रिक्षाचालकांच्या दरम्यान एका सभेचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या सभेत आपले विचार व्यक्त करताना, मंगेश दांडेकर बोलत होते. सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्यांसाठी कोठे, किती खर्च केला व तो कोणत्या ठिकाणी केला? या सर्वांचा लेखा-जोखा नागरिकांना टिपणीद्वारे दिला गेला पाहिजे व ही बाब केवळ बांधकाम खात्यालाच लागू न होता सर्व खात्यांची माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी तहसीलदारांनी आग्रही भूमिका घेतली पाहिजे, अशी जोरदार मागणी केली. आज साइडपट्टीवर कोट्यवधी रु पये खर्च केल्याचे बांधकाम खाते दाखवते मग या साइडपट्ट्या वास्तवात कोठे आहेत याचा खुलासा करावा, असेसुद्धा प्रतिपादन दांडेकर यांनी केले. लोकांचा प्रश्न सोडवा, अन्यथा आम्हाला आंदोलन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे मंगेश दांडेकर यांनी सांगितले.
राष्ट्रवादी तालुका निरीक्षक फैरोझ घलटे यांनी नांदगावमधील शंकर मंदिर ते भवानी पाखाडी हा रस्ता खूप खराब झाला आहे तो निदान गणपती उत्सवापूर्वी तरी तयार करण्यात यावा, अशी जोरदार मागणी केली. माजी सरपंच इम्तियाज मलबारी यांनी नांदगाव व सुपेगाव ही गावे पर्यटन क्षेत्र असल्याने येथे पर्यटकांची वर्दळ असते. हे रस्ते तरी त्वरित करून मिळावेत, अशी मागणी या वेळी त्यांनी केली.
या वेळी तहसीलदार उमेश पाटील, सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहायक अभियंता संदीप चव्हाण, अभियंता नीलेश खिलारे, दिलीप मदने, राष्ट्रवादी पक्षाचे तालुका निरीक्षक फैरोज घलटे, माजगाव उपसरपंच योगेंद्र गोयजी, माजी सरपंच इम्तियाझ मलबारी, उपाध्यक्ष नरेंद्र हेदुलकर, मियाजन कादरी, विजय भोय, अनंत ठाकूर, रामदास मिणिमने, सर्कल रमेश म्हात्रे आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकांच्या या सर्व प्रश्नांना उत्तर देताना बांधकाम खात्याचे सहायक अभियंता संदीप चव्हाण यांनी, आगरदांडा ते खाजणीमार्गे इंदापूर हा रस्ता २१ जून रोजी मुख्यमंत्री यांच्यासमवेत झालेल्या चर्चेनुसार, रस्ते विकास महामंडळ (एमएमआरडीए) यांच्याकडे वर्ग करण्यात आला असून, या रस्त्याची डागडुजी व तो रस्ता नव्याने बांधणे या प्रकारची सर्व कामे हा विभाग करणार आहे. या कामाचा ठेका ठेकेदार जे. एम. म्हात्रे यांनी घेतला आहे. ते दिवाळीपूर्वी येथील कामाची सुरु वात करतील, असा विश्वास या वेळी त्यांनी व्यक्त केला.
आगरदांडा ते सावली या रस्त्याला जे खड्डे पडले आहेत ते बुजवण्यासाठी आजच्या सभेचा अहवाल रस्ते विकास महामंडळास देऊन यावर त्वरित कार्यवाहीसाठी निश्चित प्रयत्न करू, असे अभिवचन या वेळी चव्हाण यांनी दिले. मुरु ड ते साळाव रस्त्यासाठी बांधकाम खात्याशी संपर्क साधून निधीसाठी प्रयत्न करणार असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले.
तहसीलदार उमेश पाटील यांनी, आगरदांडा ते सावली येथील लोकांच्या भावना खूप तीव्र आहेत. येथील खड्डे कसे लवकरात लवकर बुजतील व स्थानिक नागरिकांना कसा दिलासा मिळेल, यासाठी बांधकाम खात्याच्या अधिकारीवर्गाने प्रयत्न करून चांगला प्रतिसाद द्यावा, असे सांगितले. गणपतीपूर्वी मुरु ड ते साळाव, तसेच मुरु ड ते सावली येथील खड्डे बुजलेच पाहिजे यासाठी ढिसाळपणा करू नये, अन्यथा आपली तक्र ार वरिष्ठ कार्यालयास करू, असा इशारा या वेळी त्यांनी दिला आहे.