रिक्षाचालकाचा मुलगा बनला फौजदार
By Admin | Published: May 23, 2017 05:26 AM2017-05-23T05:26:21+5:302017-05-23T05:26:21+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने खात्याअंतर्गत नुकत्याच घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षकाच्या (फौजदार) परीक्षेत सावरगाव (ता. मुळशी) येथील सामान्य कुटुंबातील रिक्षाचालक सुरेश श्रीपती साठे
लोकमत न्यूज नेटवर्क
पिरंगुट : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने खात्याअंतर्गत नुकत्याच घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षकाच्या (फौजदार) परीक्षेत सावरगाव (ता. मुळशी) येथील सामान्य कुटुंबातील रिक्षाचालक सुरेश श्रीपती साठे यांचा मुलगा सुधीर सुरेश साठे यांनी खात्याअंतर्गत झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विभागीय परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवीत उत्तीर्ण होऊन आपल्या वडिलांचे आपला मुलगा पोलीस अधिकारी व्हावा हे पाहिलेले स्वप्न पूर्ण केले.
सावरगाव (ता. मुळशी) येथील रिक्षाचालक सुरेश श्रीपती साठे यांना दोन मुलगे व मुलगी आहे. त्यांनी हलाखीच्या परिस्थितीमध्ये रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा गाडा चालविला व आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले.
त्यातच मुलगा फौजदार व्हावा, ही त्यांची तीव्र इच्छा होती.
त्यामध्येच त्यांचा मुलगा सुधीर हे २००८ मध्ये राज्य राखीव बल गट क्रमांक १ पुणे या ठिकाणी पोलीस दलात भरती झाला.
परंतु पोलीस शिपाईपदावर समाधान न मानता आपण पोलीस अधिकारीपदावर रुजू व्हावे, हे वडिलांचे स्वप्न असल्यामुळे सुधीर यांनी आपले कर्तव्य सांभाळत मोठ्या जिद्द व चिकाटीने फौजदार परीक्षेचा अभ्यास सुरू केला व शेवटी त्यांच्या मेहनतीला व कष्टाला २०१६ मध्ये झालेल्या फौजदार परीक्षेत यश मिळाले. त्यांच्या या यशाबद्दल सर्वच स्तरांतून त्यांचे कौतुक केले जात आहे. जन्मभूमी सावरगाव (ता. मुळशी) या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
सुधीर साठे यांनी शंकरराव मोरे विद्यालय व कॉलेज पौड रोड एरंडवणा पुणे येथून बारावीपर्यंत शिक्षण घेतले. यशवंतराव मोहिते कॉलेज पुणे येथून वाणिज्य शाखेमधून पदवी प्राप्त केली आहे.