एफसी बार्सिलोनाची मुंबईत एन्ट्री
By Admin | Published: August 26, 2016 03:44 AM2016-08-26T03:44:25+5:302016-08-26T03:44:25+5:30
लिओनेल मेस्सी, नेमार आणि लुईस सुआरेज अशा स्टार फुटबॉलर्सचा क्लब अशी ओळख असलेल्या एफसी बार्सिलोना या क्लबने नुकताच मुंबईमध्ये एन्ट्री केली
मुंबई : लिओनेल मेस्सी, नेमार आणि लुईस सुआरेज अशा स्टार फुटबॉलर्सचा क्लब अशी ओळख असलेल्या एफसी बार्सिलोना या क्लबने नुकताच मुंबईमध्ये एन्ट्री केली आहे. विशेष म्हणजे ६ ते १८ वयोगटातील गुणवान मुंबईकर खेळाडूंना थेट बार्सिलोना क्लबच्या एफसीबीइस्कोला स्कूलमधून फुटबॉल प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.
बुधवारी मुंबईतील नरिमन पॉइंट येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये एफसी बार्सिलोना क्लबने आपल्या या उपक्रमाची माहिती देताना क्लबच्या जर्सीचे अनावरणही केले. या उपक्रमाअंतर्गत शहरमध्ये माटुंग्याच्या डॉन बॉस्को हायस्कूल, तर
उपनगरमध्ये अंधेरीच्या सेंट डॉमनिक साव्हिओ हायस्कूल येथे शिबीराला सप्टेंबरच्या मध्यंतराला सुरुवात होईल, अशी माहिती आयोजकांनी दिली.
एफसी बार्सिलोनाच्या या विशेष उपक्रमातून सुमारे हजार नवोदित फुटबॉलपटूंना शिकण्याची संधी मिळणार असून याआधी एफसी बार्सिलोनाने नवी दिल्लीत घेतलेल्या शिबीरालाही मोठा प्रतिसाद
मिळाला होता. तसेच २०१३ साली एफसीबीच्या वतीने झालेल्या पाच दिवसीय शिबीरात जवळपास २०० युवा फुटबॉलपटूंनी सहभाग नोंदवला होता.
‘‘हा उपक्रम मोठा असून सुमारे ३६ आठवड्यांचा असेल. बार्सिलोनाच्या या शिबीरासाठी दोन्ही केंद्रामध्ये आवश्यक सोयीसुविधा पुरवल्या गेल्या आहेत. मुंबई शहर व उपनगरातील दोन्ही केंद्रांमध्ये प्रत्येकी निवडक ५०० फुटबॉलपटूंचा सहभाग असेल. तसेच हे शिबीर ६-१८ वयोगटातील मुलांसाठी खुले आहे, असे कॉन्सिएंट फुटबॉलच्या संचालिका अनुपमा जैन यांनी यावेळी सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी)