राज्यात अकरावी प्रवेशासाठी आजपासून एफसीएफएस फेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 07:01 AM2021-09-28T07:01:18+5:302021-09-28T07:01:57+5:30

सात टप्प्यांत विभागणी : विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आणखी एक संधी

FCFS round from today for eleventh admission in the state maharashtra pdc | राज्यात अकरावी प्रवेशासाठी आजपासून एफसीएफएस फेरी

राज्यात अकरावी प्रवेशासाठी आजपासून एफसीएफएस फेरी

Next
ठळक मुद्देसात टप्प्यांत विभागणी : विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आणखी एक संधी

मुंबई : राज्यातील पाच विभागांत ऑनलाइन अकरावी प्रवेशासाठी प्रवेशाच्या तीन नियमित व एक विशेष फेरी होऊनही अद्याप दोन लाखांहून अधिक जागा रिक्त आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी अद्यापही अनेक कारणांनी प्रवेश घेतलेले नाहीत, तर अनेकजण प्रवेशाच्या यादीत नाव न आल्याने प्रवेशापासून वंचित आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) फेरीला मान्यता देण्यात आली असून, मंगळवारपासून ही फेरी राबविण्यात येणार आहे. या फेरीची सात टप्प्यांत विभागणी करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेत प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे. 

अंतर्गत मूल्यमापन प्रक्रियेमुळे दहावीचा सगळ्यात जास्त निकाल यंदा लागला. मात्र अपेक्षेपेक्षा कमी प्रवेशाची निश्चिती झाल्याने विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. अनेकांना महाविद्यालयांच्या नव्वदीपार कट ऑफमुळे यादीत जागाच मिळाली नाही. अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी एफसीएफएसचे आयोजन केले आहे. मंगळवारपासून (दि. २८) या फेरीला सुरुवात होत असून, १३ ऑक्टोबरपर्यंत ही फेरी सुरू राहणार आहे. ज्या महाविद्यालयांमध्ये रिक्त जागा आहेत, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अर्ज करून हे प्रवेश घेता येणार आहेत. पहिल्या फेरीसाठी दि. २८ व २९ सप्टेंबर या दोन दिवसांत नोंदणी करून संबंधित महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित करता येणार आहेत, तर शेवटचा टप्पा एटीकेटीच्या विद्यार्थ्यांसाठी १३ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. यानंतरही रिक्त राहिलेल्या जागांची माहिती शिक्षण विभागाकडून जाहीर केली जाणार असल्याचे शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी सांगितले.

विशेष फेरीच्या अखेर अमरावती विभागात ८,९५७, मुंबई विभागात १,८४,७०१, नागपूर विभागात २८,९३४, नाशिक विभागात १६,५४५, तर पुणे विभागात ६०,८७८ प्रवेश झाले आहेत. राज्यभरातील या पाच विभागात विशेष फेरीच्या अखेर तीन लाख १५ प्रवेश झाले आहेत. अद्यापही दोन लाख ३४ हजार जागा रिक्त असून, एफसीएफएस फेरीत या जागांवर प्रवेश होणार आहेत. 

एफसीएफएस प्रवेशाचे टप्पे 

पहिला टप्पा 
२८ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर
९० टक्क्यांवरील विद्यार्थी
दुसरा टप्पा
३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर,
८० टक्क्यांवरील विद्यार्थी 
तिसरा टप्पा
२ ते ४ ऑक्टोबर
७० टक्क्यांवरील विद्यार्थी 
चौथा टप्पा
५ ते ६ ऑक्टोबर
६० टक्क्यांवरील विद्यार्थी 
पाचवा टप्पा 
७ ते ९ ऑक्टोबर
५० टक्क्यांवरील विद्यार्थी 
सहावा टप्पा
१० ते १२ ऑक्टोबर
दहावी पास होऊन प्रवेशास पात्र असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी 
सातवा टप्पा
१३ ते १४ ऑक्टोबर
एटीकेटी उत्तीर्ण आणि दहावी उत्तीर्ण असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी.

Web Title: FCFS round from today for eleventh admission in the state maharashtra pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.