पंढरपुरात 'एफडीए' ची मोठी कारवाई; विनापरवाना बाटलीबंद पाण्याचा व्यवसायिकावर धाड
By Appasaheb.patil | Published: July 16, 2024 02:49 PM2024-07-16T14:49:12+5:302024-07-16T15:16:43+5:30
३ हजार पाण्याचे बॉटल केले जप्त
सोलापूर : लेबलदोष, विनापरवाना बाटलीबंद पाण्याचे व्यवसाय करीत असलेल्या एका ड्रिकिंग वॉटर सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाने अचानक धाड टाकली. या धाडीत ३ हजार पाण्याचे बॉटल जप्त केले आहे. या कारवाईनंतर या पेढीस अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत परवाना मंजूर होईपर्यंत व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
पंढरपुरात सध्या आषाढी वारीचा सोहळा सुरू आहे. आषाढी सोहळ्यात अन्न व औषध प्रशासन अलर्ट असून बनावट खाद्यपदार्थ, दुषित पाण्याचा पुरवठा करणाऱ्या व्यवसायिकांवर कारवाई करण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासन, सोलापूर या कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. उमेश भुसे हे पंढरपुरात आषाढी यात्रेच्या अनुषंगाने तपासणी करीत असताना स्मार्ट कंपनीच्या बाटली बंद पाणी बॉटलवर लेबलदोष असल्याचे आढळून आले.
त्यानंतर भुसे हे तात्काळ सदर पाणी बॉटलवर नमूद मे. पृथ्वीराज एंटरप्राइज, मु. पोस्ट. लक्ष्मी दहिवडी (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) या कंपनीस भेट दिली. तपासणी वेळी ही पेढी ही विनापरवाना बाटलीबंद पाण्याचे व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले . त्यानंतर उमेश भुसे यांनी "स्मार्ट" पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर या अन्न पदार्थांचा नमुना विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित ३ हजार बॉटल्स विनापरवाना व्यवसाय, लेबलदोषच्या अनुषंगाने जप्त केला.
दरम्यान, सदरच्या पाणी बॉटलचा नमुना विश्लेषणासाठी अन्न विश्लेकांकडे पाठविण्याचे कामकाज चालु आहे. सदरची कारवाई पुणे विभागाचे सह आयुक्त सुरेश अन्नपुरे, सोलापूर कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) सुनिल जिंतुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी डॉ उमेश भुसे व नमुना सहाय्यक श्रीशैल हिटनळ्ळी यांच्या पथकाने पूर्ण केली.