मिनरल वॉटर कंपन्यांना एफडीएने दिला झटका
By admin | Published: May 23, 2016 02:06 AM2016-05-23T02:06:09+5:302016-05-23T02:06:09+5:30
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने वर्षभरात विनापरवाना मिनरल वॉटरचे उत्पादन करणाऱ्या १४ कंपन्यांवर छापे टाकून कारवाई करण्यात आली.
पुणे : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने वर्षभरात विनापरवाना मिनरल वॉटरचे उत्पादन करणाऱ्या १४ कंपन्यांवर छापे टाकून कारवाई करण्यात आली. तर १९ मिनरल वॉटर कंपन्यांना प्रतिबंधात्मक आदेश बजावण्यात आले आहेत. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शुद्ध पाणी असल्याचा देखावा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कंपन्यांना हिसका दाखविण्यात आला आहे.
अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी रविवारी अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कामगिरीचा तिमाही आढावा घेतला. या वेळी सहआयुक्त शशिकांत केंकरे व सहआयुक्त एस. टी. पाटील उपस्थित होते.
एफडीएच्या वतीने वर्षभराचा आढावा सादर करण्यात आला. सध्या मिनरल वॉटर कंपन्यांचे मोठे पेव राज्यभर फुटले आहे. बेकायदेशीरपणे बोअर, विहिरीचे पाणी बाटली बंद करून मोठा नफा कमविण्याचे प्रकार सर्रास सुरू आहे. त्यांच्याविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने जोरदार मोहीम उघडली आहे.
पुणे विभागाच्या वतीने जिल्ह्यातील विनापरवाना मिनरल वॉटरचे उत्पादन करणाऱ्या १४ कंपन्यांवर धाडी टाकून २ लाख ५१ हजार रुपयांचा पाण्याच्या बाटलींचा साठा जप्त केला. त्याचबरोबर विनापरवाना कार्यरत असलेल्या १९ मिनरल वॉटर कंपन्यांना प्रतिबंधात्मक आदेश बजावण्यात आले आहेत.
(प्रतिनिधी)एफडीएच्या वतीने मार्च २०१६ अखेरपर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिकांना ४५ हजार ९७२ परवाने दिले आहेत. त्याचबरोबर १ लाख ८१ हजार ८३८ प्रमाणपत्र मंजूर केले. परवाना शुल्कापोटी मार्च २०१६ अखेरपर्यंत एकूण ४१ कोटी ८५ लाख ५८ हजार रूपयांचे शुल्क वसूल करण्यात आले आहे. त्याचबरोबर पुणे विभागाच्या वतीने २ हजार ३५८ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले, त्यापैकी १३३ नमुने असुरक्षित आढळून आले, तर ३४७ नमुने निश्चित केलेल्या निकषाप्रमाणे नव्हते. गुटखा मुक्ती अभियानांतर्गत ४७५ पानटपऱ्यांवर धाडी टाकून ४ कोटी २८ लाख ७४ हजार रूपये किमतीचा साठा वर्षभरात जप्त करण्यात आला. दुधामध्ये भेसळ करणाऱ्या १६ दूध उत्पादकांवर धाडी टाकून ६ लाख रूपयांचा साठा जप्त केला. कृत्रिमरीत्या फळे पिकविणाऱ्या केवळ ४ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात एफडीएला यश आले. मार्केट यार्ड येथे दोघा घाऊक आंबा विक्रेत्यांकडून आंबे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर केला जात असल्याचे आढळून आल्याचे एफडीएच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.