मीरा रोडमध्ये निकृष्ट दर्जाचा बर्फ बनविणा-या कारखान्यावर एफडीएची कारवाई

By admin | Published: May 9, 2017 07:23 PM2017-05-09T19:23:46+5:302017-05-09T19:23:46+5:30

माणिक जाधव, वेदपाठक यांच्या पथकाने सहाय्यक आयुक्त ए. आर. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी कारखान्यावर धाड टाकून शेकडो किलो बर्फ नष्ट केला.

FDA proceedings against mining factory in Meera Road | मीरा रोडमध्ये निकृष्ट दर्जाचा बर्फ बनविणा-या कारखान्यावर एफडीएची कारवाई

मीरा रोडमध्ये निकृष्ट दर्जाचा बर्फ बनविणा-या कारखान्यावर एफडीएची कारवाई

Next

राजू काळे/लोकमत ऑनलाईन
भार्इंदर, दि. 9 - मीरा रोड येथील एका कारखान्यात निकृष्ट दर्जाचा बर्फ बनविला जात असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाला मिळाल्याने अन्न निरीक्षक माणिक जाधव, वेदपाठक यांच्या पथकाने सहाय्यक आयुक्त ए. आर. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी कारखान्यावर धाड टाकून शेकडो किलो बर्फ नष्ट केला.

उघड्यावर विकण्यात येणारा बर्फ आरोग्यास अपायकारक असल्याचे सिद्ध झाल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने उघड्यावर बर्फ विकणा-या आणि बर्फ तयार करणा-या कारखान्यांवर करडी नजर ठेवली आहे. त्यातच मीरा रोड येथील मे. डेल्टा रेफ्रिजरेशन कारखान्यात निकृष्ट दर्जाचा बर्फ बनविण्यात येत असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. त्यानुसार विभागाच्या वरील पथकाने मंगळवारी कारखान्यावर धाड टाकून त्यात बनविण्यात येणा-या बर्फाचे निरीक्षण केले. त्यावेळी बर्फासाठी वापरण्यात येणारे पाणी शुद्ध नसल्याचे तसेच बर्फ बनविण्यासाठी वापरण्यात येणारे साचे स्वच्छ नसल्याचे निदर्शनास आले. ही बाब आरोग्यासाठी हानिकारक असल्याने पथकाने तयार करण्यात आलेला बर्फ ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली.

पथकाने प्रती 120 किलोप्रमाणे 55 बर्फाच्या लाद्या असा एकूण 13 हजार 200 रुपये किमतीचा 6 हजार 600 किलो बर्फ जप्त करून तो मीरा रोड येथील जाफरी खाडीत नष्ट केला. तसेच त्याचा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला. कारखान्यात तयार होणारा बर्फ हा शहरातील बर्फाचा गोळा विकणा-या फेरीवाल्यांसह मासळी साठविण्यासाठी विकला जात होता. तसेच बर्फ बनविण्यासाठी कारखान्याकडे संबंधित सरकारी विभागाचा परवानाच नसल्याचे उघडकीस आले. बर्फाच्या नमुना तपासणी अहवालानंतर कारखानदारावर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पथकातील अन्न निरीक्षक जाधव यांनी सांगितले.

Web Title: FDA proceedings against mining factory in Meera Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.