वसईच्या उमंग फार्माटेकवर एफडीएचा छापा
By admin | Published: September 13, 2014 02:51 AM2014-09-13T02:51:40+5:302014-09-13T02:51:40+5:30
‘उमंग फार्माटेक प्रायव्हेट लिमिटेड’ या वसई तालुक्यातील पेल्हार गावातील कंपनीने परवान्याची मुदत संपली असताना औषधनिर्मिती, विक्री व निर्यात केल्याचा ‘लोकमत’ने भंडाफोड केला
मुंबई : ‘उमंग फार्माटेक प्रायव्हेट लिमिटेड’ या वसई तालुक्यातील पेल्हार गावातील कंपनीने परवान्याची मुदत संपली असताना औषधनिर्मिती, विक्री व निर्यात केल्याचा ‘लोकमत’ने भंडाफोड केला. या प्रकरणी सहायक आयुक्त गिरीश हुकरे यांच्या नेतृत्वाखाली एफडीएने ‘उमंग फार्माटेक’वर नुकताच छापा मारला. मुंबईतील जवाहरलाल पोर्ट ट्रस्ट बंदरातून ही निर्यात झाल्याने केंद्रीय मानक नियंत्रण संघटनेच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह लागले आहे.
या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’च्या दि. १२ सप्टेंबरच्या अंकात छापून आले आहे.या कंपनीकडे वेगवेगळ्या औषधनिर्मितीचे १३४ परवाने असून, त्यांची मुदत २०१६पर्यंतची आहे. या प्रकरणी एफडीएने कारवाई सुरू केली असली तरी, हे प्रकरण आयात - निर्यातीशीसुद्धा निगडित असल्याने औषधांच्या आयात-निर्यातीवर नियंत्रण ठेवणाऱ्या केंद्रीय मानक नियंत्रण संघटना (सीडीएससीओ)ने कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप सहायक आयुक्त वखारीया यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.
लाखो डॉलरचे सौदे...
‘डीएचए पॅलेट’ या रसायनाच्या परवान्यावर २० मार्च २०१४ रोजी वखारिया यांनी स्वाक्षरी केली आहे. मात्र हे रसायन १० मार्च २०१४ रोजी कॅनडा या देशातील विवा फार्मास्युटिकल या कंपनीला दीड लाख अमेरिकन डॉलरमध्ये विकण्यात आले.
एफडीएचे स्पष्टीकरण
जुलै महिन्यात आम्ही तेथे आॅडिट केले होते. मात्र ती सर्वसाधारण भेट असल्याने सखोल चौकशी केली नाही. लोकमतने दिलेल्या माहितीमुळे सदर कंपनीविरोधात चौकशी व कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. योग्य परवाना नसताना एखाद्या औषधाचे उत्पादन अथवा विक्री करणाऱ्या किंवा परवाना मिळण्याआधीच जर उत्पादन व विक्री केली असल्यास अशा कंपनीचा परवाना रद्द होऊन फौजदारी खटला दाखल होऊ शकतो, असे ‘उमंग फार्माटेक’च्या बाबतीत अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त गि. खु. वखारिया यांनी स्पष्ट केली.