Remdesivir issue: एफडीए आयुक्त अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 06:02 AM2021-04-21T06:02:13+5:302021-04-21T06:03:04+5:30
परवानगीनंतर एकही इंजेक्शन आले नाही . बीडीआर कंपनीला महाराष्ट्रात रेमडेसिविरचा पुरवठा करण्याची तातडीने परवानगी द्यावी, असा आग्रह मंत्रिमंडळातील एका ज्येष्ठ मंत्र्याने धरला होता. या कंपनीने कोणतीही परवानगी मागितलेली नसताना किंवा त्यांचा आपल्याकडे अर्जदेखील नसताना, त्यांना परवानगी कशी द्यायची, असा मुद्दा उपस्थित झाला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एफडीए आयुक्त अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून, विक्रीकर आयुक्त परिमल सिंग यांच्याकडे आयुक्तपदाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनच्या पुरवठ्यावरून गेले काही दिवस सुरू असलेल्या गदारोळात काळे यांची बदली झाली आहे.
बीडीआर कंपनीला महाराष्ट्रात रेमडेसिविरचा पुरवठा करण्याची तातडीने परवानगी द्यावी, असा आग्रह मंत्रिमंडळातील एका ज्येष्ठ मंत्र्याने धरला होता. या कंपनीने कोणतीही परवानगी मागितलेली नसताना किंवा त्यांचा आपल्याकडे अर्जदेखील नसताना, त्यांना परवानगी कशी द्यायची, असा मुद्दा उपस्थित झाला होता. मात्र, आपल्याला इंजेक्शनची गरज आहे, तातडीने त्यांना परवानगी दिली पाहिजे, असा आग्रह संबंधित मंत्र्यांनी धरला होता. शेवटी एफडीए आयुक्त काळे यांनी बीडीआर कंपनीने तोंडी विनंती केलेली आहे. ती गृहीत धरून त्यांना आम्ही परवानगी देत आहोत, असे पत्र काढले होते. कागदपत्रे तुम्ही तातडीने सादर करावीत, असेही त्या पत्रात नमूद करण्यात आले होते. त्याच वेळी अन्य कंपन्यांनादेखील तुम्ही तातडीने अर्ज करा, आम्ही तुम्हाला परवानगी देतो, अशी भूमिका एफडीए आयुक्तांनी घेतली होती. दोन्ही कंपन्यांना गुजरात आणि दमण प्रशासनाने राज्याबाहेर इंजेक्शन विक्रीला बंदी घातली आहे.
परिमल सिंग नवे आयुक्त
विरोधी पक्षनेत्यांच्या आग्रहावरून तातडीने परवानगी दिलेली ब्रूक कंपनी व काही ज्येष्ठ मंत्र्यांनी सुचवलेली बीडीआर या दोन्ही कंपन्यांनी महाराष्ट्राला अद्याप एकही इंजेक्शन दिलेले नाही, अशी माहिती आहे. काळे यांच्या जागी परिमल सिंग यांनी रात्री उशिरा पदभार स्वीकारल्याचे समजते.