गतिरोधकामुळेच अपघाताची भीती
By admin | Published: June 9, 2016 02:12 AM2016-06-09T02:12:50+5:302016-06-09T02:12:50+5:30
सुधा नदीवरील पुलावर प्रवेश करताना टाकण्यात आलेले दोन्ही बाजूंचे गतिरोधक वाहनचालकांना लांबून दिसत नाहीत.
देहूगाव : तळेगाव-चाकण रस्त्यावरील सुधा नदीवरील पुलावर प्रवेश करताना टाकण्यात आलेले दोन्ही बाजूंचे गतिरोधक वाहनचालकांना लांबून दिसत नाहीत. त्यामुळे वेग कमी केला न गेल्याने वाहने गतिरोधकावरून उंच उडतात. त्यामुळे चालकांचा वाहनांवरील ताबा सुटून अपघात होण्याची शक्यता असल्याने हे गतिरोधक अत्यंत धोकादायक बनले आहेत.
अपघात टाळण्यासाठी टाकण्यात आलेले गतिरोधक हेच अपघातास कारणीभूत होऊ शकतात. अशा गतिरोधकांवर तातडीने परावर्तक बसवावेत, अथवा पांढरे पट्टे मारण्यात यावेत, अशी मागणी येथील उपसरपंच बाळासाहेब गाडे यांनी केली आहे. सुधा नदीवर तळेगाव व चाकणकडून एकेरी वाहतूक करणारे दोन स्वतंत्र पूल आहेत. यापैकी एक स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. त्यालाच लागून नवा पूल अलीकडेच बांधण्यात आला आहे. हे पूल खोलगट व वळणावर असल्याने तळेगाव व चाकणच्या बाजूने येणाऱ्या वाहनचालकांना हा पूल लवकर दिसत नाही. दोन्ही बाजूला तीव्र उतारही आहेत. त्यामुळे चालकांना पुला व वळणाचा अंदाज येत नाही. परिणामी, येथे वारंवार अपघात होतात. अपघात टाळण्यासाठी पुलाच्या सुरुवातीलाच वाहनांची गती कमी करण्यासाठी व तळेगाव व चाकणच्या मार्गावर मोठे गतिरोधक टाकण्यात आले आहेत. ते उंच व मोठे तर आहेत. त्यावर कोणताही परावर्तक किंवा पांढरे पट्टे लावलेले नसल्याने वाहनचालकांना हे गतिरोधक रात्रीच नाही, तर दिवसाही लवकर दिसत नाहीत. (वार्ताहर)
>गतिरोधक दिसत नसल्याने वाहनांचा वेग कमी होत नाही किंवा वाहनचालकांना वाहनांचा गतिरोधक दिसल्यानंतर वेग कमी करण्यास संधी मिळत नाही. वाहने वेगात असल्याने गतिरोधकावर वाहने उंच उडतात. वाहने उंच उडाल्याने वाहनचालकांचा वाहनावरील ताबा सुटून वाहन थेट नदीच्या पात्रात जाऊन मोठा अपघात होण्याची शक्यता आहे किंवा वाहनांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.