भय इथले संपत नाही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2017 01:05 AM2017-04-05T01:05:20+5:302017-04-05T01:05:20+5:30
वाहने फिरविण्याच्या स्पर्धा लागल्याचे प्रकार वाघोलीतील शाळा व महाविद्यालय परिसरामध्ये सर्रास पाहावयाला मिळत आहेत
वाघोली : विद्यार्थिनी व मुलींना आकर्षित करण्यासाठी बुलेटचा फटाका आणि सायलेन्सरच्या पुंगळ्या काढून भरधाव वेगाने वाहने फिरविण्याच्या स्पर्धा लागल्याचे प्रकार वाघोलीतील शाळा व महाविद्यालय परिसरामध्ये सर्रास पाहावयाला मिळत आहेत. विद्यार्थी व तरुणांना पोलिसांची भीतीच उरली नसल्याने धोकादायकरीत्या वाहने चालवली जात आहेत. पुढील अनर्थ टाळण्यासाठी पोलिसांनी अशा टवाळखोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पालकवगार्तून होत आहे.
वाकड येथे एका तरुणीवर झालेल्या हल्ल्याचा निषेध सर्व स्तरातून होत असतानाच पालकवर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरू लागले आहे. वाघोली परिसरामध्ये मुलींची छेडछाड करण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याच्या तक्रारी पालकवर्गातून येत आहेत. अनेक मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी मुलांमध्ये स्पर्धाच लागल्याचे चित्र यामुळे निर्माण झाल्याचे दिसून येते. यासाठी अनेक नामी क्लृप्त्या तरुणांकडून केल्या जातात. वाघोली परिसरात असणाऱ्या ८ मोठ्या महाविद्यालय आणि शाळांच्या परिसरामध्ये महागड्या वस्तूंचे प्रदर्शन करण्याबरोबरच महागड्या गाड्या घेऊन भरधाव वेगात मिरविण्याचे प्रकारदेखील केले जातात. विद्यार्थिनींना आकर्षित करण्यासाठी अनेक मुले बुलेटचा फटाका, सायलेन्सरच्या पुंगळ्या काढणे, स्टंट करणे आदी प्रकार शाळा-महाविद्यालय परिसरामध्ये केले जातात. महाविद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थिनींच्या घरापर्यंत पाठलाग करणे, दबाव टाकणे, अश्लील कॉमेंट्स करण्याचे प्रकार केले जातात. सदरचा प्रकार विद्यार्थिनींनी घरी अथवा महाविद्यालय प्रशासनाला सांगितल्यास शाळेच्या बाहेरील विषय असल्याचे सांगून तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई करून हाथ झटकले जातात. मात्र पुन्हा तेच प्रकार विद्यार्थ्यांकडून केले जातात.
उपनगरात असलेल्या अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये पुणे व अन्य ठिकाणाहून असंख्य तरुणी शिक्षणासाठी आल्या आहेत़ एकेकाळी सुरक्षित म्हटले जाणारे पुणे शहर आता तेवढे सुरक्षित राहिले नसल्याची भावना या तरुणींच्या मनात आहे़ काही ठिकाणी पोलिसांच्या प्रयत्नांमुळे या तरुणींना सुरक्षित वाटत असले तरी पुढे येऊन तक्रार दिली तर, आपल्यालाच त्रास होईल, या भीतीने तरुणी तक्रार देण्यास धजावत नसल्याचे चित्र दिसून येत आहे़
पोलीस प्रशासनाच्या वतीने पाच महिन्यांपूर्वी दामिनी पथक व पोलिसांच्या एका पथकाने शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात गस्त घालून अनेक टवाळखोरांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्या वेळी अनेक दिवस पोलीस गस्त घालून वाहन ताब्यात घेत होते. त्या वेळी विद्यार्थिनींमध्ये समाधानाचे वातावरण होते, मात्र थोड्या दिवसांची कारवाई पोलिसांनी केल्यानंतर याकडे दुर्लक्ष झाले आणि तरुण उत्साही कार्यकर्त्यांची वेगाशी स्पर्धा पुन्हा सुरू झाली आहे.
सायलेन्सरची पुंगळी त्रासदायक
महाविद्यालय-शाळा परिसरामध्ये अनेक तरुण-विद्यार्थी दुचाकीतून मोठा आवाज काढण्यासाठी सायलेन्सरच्या पुंगळ्या काढतात. भरधाव वेगाने दुचाकी चालविल्यास रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. या आवाजाच्या त्रासाला कंटाळून अनेकांनी पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत, परंतु यावर तात्पुरती कारवाई करून सोडून दिले जाते. कारवाईच होत नसल्याने आवाजाचा खेळ अजूनही सुरू आहे. सायलेन्सरची पुंगळी सर्वांनाच त्रासदायक ठरत आहे. याचा सर्वप्रथम बंदोबस्त करावा अशी मागणी प्रामुख्याने होत आहे.
>अनेक महाविद्यालांमध्ये मुलींसाठी असणाऱ्या प्रतिसाद अॅपची जनजागृती करण्यात आली आहे. विद्यार्थिनींना त्रास होत असल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, त्याबाबत आम्ही कारवाई करू.
- सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक