दुष्काळाची भीती कायम

By admin | Published: September 22, 2015 02:16 AM2015-09-22T02:16:59+5:302015-09-22T02:16:59+5:30

राज्यातील दुष्काळी भागात गेले काही दिवस समाधानकारक पाऊस झाला असला तरी दुष्काळाची भीती अद्याप पूर्णपणे गेलेली नाही, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केले.

The fear of drought continues | दुष्काळाची भीती कायम

दुष्काळाची भीती कायम

Next

मुंबई : राज्यातील दुष्काळी भागात गेले काही दिवस समाधानकारक पाऊस झाला असला तरी दुष्काळाची भीती अद्याप पूर्णपणे गेलेली नाही, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केले. ते मंत्रालयात पत्रकारांशी बोलत होते. धरणांमधील वाढलेला पाणीसाठा आणि टँकर व चारा छावण्यांची घटलेली संख्या या बाबी दिलासा देणाऱ्या असल्याचे ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी आज दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील तसेच सोलापूर, सांगली, सातारा आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदतीचे वाटप करावे, वन हक्क कायद्याअंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर शेतकऱ्याचे नाव नोंदवावे, असे निर्देश मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी या वेळी दिले.
पिकांचे ३३ टक्के वा त्यापेक्षा जास्त नुकसान झाल्यास टंचाई जाहीर करण्याचे धोरण आहे. हे लक्षात घेता आजही हजारो गावे टंचाईच्या टप्प्यात आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत त्याबाबत आढावा घेण्यात येईल. केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव पाठविला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
परतीच्या पावसामुळे रब्बी पिकाच्या पेरण्या ७० लाख हेक्टरपर्यंत होतील, असा अंदाज आहे. जलयुक्त शिवार योजनेला या पावसाचा फायदा झाला आहे. सध्याच्या पावसाने बहुतांश जिल्ह्यांत जूनपर्यंत पुरेल इतका जलसाठा निर्माण झाला आहे; तर अवर्षणग्रस्त भागातील स्थितीत सुधारणा झाली असून, या भागातही मार्चपर्यंत पाणीटंचाई भेडसावणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात १४ सप्टेंबर रोजी एकूण १९९० टँकरद्वारे १५१५ गावे आणि ३२२७ वाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, आज ११९० टँकरद्वारे ९०८ गावे आणि १८४२ वाड्यांवर पाणी पुरविले जात असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: The fear of drought continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.