विरोधकांना संपविण्याची वृत्ती घातक! देशाची प्रतिमा मलिन; हायकोर्टाने ओढले ताशेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 04:40 AM2017-10-13T04:40:22+5:302017-10-13T04:40:47+5:30
विरोधक व उदारमतवादी मूल्यांना संपविण्याची वाढती प्रवृत्ती धोकादायक असून त्यामुळे देशाची प्रतिमा मलिन होत आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने बंगळुरूच्या ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा हवाला देत गुरुवारी नोंदवले.
मुंबई : विरोधक व उदारमतवादी मूल्यांना संपविण्याची वाढती प्रवृत्ती धोकादायक असून त्यामुळे देशाची प्रतिमा मलिन होत आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने बंगळुरूच्या ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा हवाला देत गुरुवारी नोंदवले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर व गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी त्यांचे कुटुंबीय तसेच केतन तिरोडकर यांनी याचिका दाखल केल्या आहेत. त्यावरील सुनावणी न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठापुढे झाली. केवळ विचारवंतच नव्हे तर उदारमतवादावर विश्वास ठेवणाºया व्यक्ती किंवा संस्थांनाही ‘लक्ष्य’ केले जाऊ शकते, अशी ही स्थिती असल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदविले. दाभोलकर व पानसरे हत्येप्रकरणी सीबीआय व एसआयटीने कोर्टात अहवाल सादर केला. त्यावर तपास यंत्रणांच्या हाती काही ठोस लागले नसल्याचे कोर्टाने नमूद केले.
तुम्ही मेहनत घेत असाल तरी मुख्य आरोपी फरार आहेत, हे सत्य आहे. प्रत्येक सुनावणीनंतर एक मोलाचा जीव जाईल. दुर्दैवाने गेल्याच महिन्यात उदारमतवादी विचाराचा (गौरी लंकेश) एक जीव बंगळुरूमध्ये गेला. भविष्यात कोणाचा बळी जाणार नाही, याची काय हमी? आरोपी चलाख असल्याने तपासासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा, असे निर्देशही मुंंबई उच्च न्यायालयाने दिले.
सनातन संस्थेच्या भूमिकेचा तपास न केल्याचा आरोप दाभोलकर व पानसरे कुटुंबीयांच्या वकिलांनी केला. मात्र न्यायालयाने तपास झाल्याचे सांगितले.