‘अटकेच्या भीतीने पळून गेलो’

By Admin | Published: December 24, 2015 02:26 AM2015-12-24T02:26:08+5:302015-12-24T02:26:08+5:30

अयाज सुल्तान बेपत्ता झाल्याच्या तक्रारीची पोलिसांनी गंभीर चौकशी सुरू केल्यामुळे पकडल्या जाण्याच्या भीतीने आम्ही तिघे मुंबईतून पळून गेलो होतो, असे वाजिद शेख याने महाराष्ट्र ‘एटीएस’ला सांगितले

'Fear of Fear of Escape' | ‘अटकेच्या भीतीने पळून गेलो’

‘अटकेच्या भीतीने पळून गेलो’

googlenewsNext

डिप्पी वांकाणी,  मुंबई
अयाज सुल्तान बेपत्ता झाल्याच्या तक्रारीची पोलिसांनी गंभीर चौकशी सुरू केल्यामुळे पकडल्या जाण्याच्या भीतीने आम्ही तिघे मुंबईतून पळून गेलो होतो, असे वाजिद शेख याने महाराष्ट्र ‘एटीएस’ला (दहशतवाद प्रतिबंधक पथक) सांगितले. तथापि, वाजिद जे सांगत आहे त्यावर ‘एटीएस’चा तूर्त विश्वास बसत नसल्याचे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. अयाज ३० आॅक्टोबरपासून बेपत्ता असून तो अफगाणिस्तानला पळून गेला आहे.
एकीकडे वाजिद पकडल्या जाण्याच्या भीतीने घरातून बाहेर पडल्याचे सांगत आहे. दुसरीकडे त्याच्या कुटुंबियांनी त्याचे घर सोडून जाण्याचे वेगळेच कारण सांगितले. पत्नीसोबतचे खटके व सासरकडील मंडळींची त्यांच्यासोबत राहण्याच्या मागणीला कंटाळून त्याने हे पाऊल उचलले, असे त्यांचे म्हणणे आहे.
वाजिद शेख, मोहसीन सय्यद आणि नूर मोहंमद १५ डिसेंबर रोजी मालवणी भागातून बेपत्ता झाले. वाजिदच्या पत्नीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत वाजिद इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी गेल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर एटीएसएने या तिघांचा छडा लावण्यासाठी मोहिम उघडली. एटीएसने वाजिदला ताब्यात घेतले. त्यानंतर बुधवारी पहाटे साडेतीन वाजता त्याची कुटुंबियांशी पुनर्भेट झाली. त्यानंतर एटीएसने सकाळी नऊ वाजता त्याला सोबत नेले. एटीएसच्या नागपाडा येथील मुख्यालयात दिवसभर त्याची चौकशी करण्यात आली. ‘अयाजचे कुटुंबिय सतत त्याचा ठावठिकाणा आम्हाला विचारत होते. त्यातच पोलिसांचीही चौकशी सुरू होती. वाजिदचे मित्र असल्यामुळे पोलिस पकडतील, अशी भीती वाटली. त्यामुळे आम्ही पळून गेलो, असे वाजिद सांगत आहे. मात्र, एटीएस त्याच्या या म्हणण्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणार नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. वाजिद आमच्यावर विश्वास ठेवेल या आशेने आम्ही त्याला पुरेसा वेळ देत आहोत, असे हा अधिकारी म्हणाला.
‘मी आधी कर्नाटकातील हरिहर येथे आणि तेथून हैदराबादला गेलो. हैदराबादेतून घरी परतत असतानाच एटीएसने अडवले. पत्नीशी वाद झाल्याने निघून गेलो होतो, असे वाजिद म्हणाल्याचे त्याची आई मुजीबा यांनी सांगितले. वाजिदची बहिण आयेशाने सांगितले की, ध्वनीचित्रफितीत काम करावे, अशी वाजिदच्या पत्नीची इच्छा होती तर वाजिदचा त्याला विरोध होता. त्यावरून लग्नाच्या अगदी पहिल्या दिवसांपासून त्यांच्यात वाद होता. आम्ही रहातो तेथे पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. त्यामुळे वाजिदची पत्नी नाराज होती. आपण माझ्या आईवडीलांसोबत घणसोली येथे राहू, असा घोषा तिने लावला होता. यावरूनही त्यांच्यात खटके उडत होते. या सर्व गोष्टीला कंटाळून वाजिद घरातून निघून गेला. जाताना सोबत नेलेले पत्नीचे नेकलेस त्याने १८ हजार ५०० रुपयांना विकले, असेही आयेशाने सांगितले.
दरम्यान, या तिघांना कट्टरवादी बनविणाऱ्या अयाजने यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. कुटुंबातील सर्वांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी अयाजवर होती. त्यामुळे तो सतत तणावाखाली रहात असे. एका कॉल सेंटरमध्ये लॅपटॉप दुरुस्तीचा तंत्रज्ञ म्हणून तो काम करत होता. प्रेयसीने साथ सोडल्यानंतर त्याने झोपेच्या गोळ््या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे अयाजची बहिण शायना हीने सांगितले. मोहसिन, वाजिद आणि अयाज हे खूप चांगले मित्र होते. अयाज स्वत:चा व्यवसाय सुरू करू इच्छित होता. त्यामुळे गेल्या जूनमध्ये त्याने नोकरी सोडली होती. मात्र, नंतर कुवैतमध्ये नोकरी मिळाल्याचे सांगून तो निघून गेला. तो परत येईल, अशी आम्हाला आशा आहे, असेही शायना म्हणाली.
> ‘सोशल मीडिया’मुळेच वाजिदचा कट्टरतेकडे कल! - पोलीस
पुणे : मुंबईच्या मालवणी भागामधून बेपत्ता झालेल्या तिघांपैकी एकाला दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) पुणे युनिटने कात्रज येथून ताब्यात घेतले. त्याचा बेंगळुरू-बेळगावपासून पाठलाग करण्यात येत होता. त्याचा इसिसशी कोणताही संबंध असल्याचे अद्यापपर्यंत स्पष्ट झालेले नसले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून तो कट्टर विचारांकडे झुकल्याचे आढळले आहे. वाजिदच्या पालकांनीच हे तीनही तरुण इसिसमध्ये जाण्याची शक्यता असल्याचे तक्रारीत म्हटल्याचे सहायक पोलीस आयुक्त भानूप्रताप बर्गे यांनी सांगितले. एका मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशनमधून तो अन्य साथीदारांशी चॅटींग करीत असल्याचेही तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेला वाजिद शेख (२५, रा. मालवणी, मालाड, मुंबई) त्याचे मित्र मोहसीन सय्यद, नूर शेख १५ डिसेंबरला मालवणीमधून गायब झाले होते. त्यानंतर वाजिद बेळगाव येथून खासगी बसने मुंबईकडे जाणार असल्याची माहिती बर्गे यांना मिळाली होती. त्यानुसार, कात्रज बस थांब्यावर सापळा लावण्यात आला व त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याला एटीएसच्या मुंबईमधील मुख्यालयात नेण्यात आले. चौकशीत त्याचा इसिसशी संपर्क आला नसल्याचे समोर आले. त्याला पालकांकडे सुपुर्द करण्यात आले. अन्य दोघांबाबत मात्र कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
बर्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाजिदचा जुना मित्र आणि आॅक्टोबरमध्ये गायब झालेला अयाज सुलतान या तिघांच्याही संपर्कात होता. अयाज या तिघांना कट्टर विचार सांगायचा. त्यांना इसिसचे व्हिडीओ क्लिप दाखवित असे. वाजिदनेही मोबाईलमध्ये इंटरनेटवर इसिस आणि दहशतवादी कारवायांसंदर्भात ‘सर्फिंग’ केल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याला हटकले होते. त्याने पासपोर्ट काढण्यासाठी कागदपत्रे जमा केली होती. अन्य दोघांच्या पासपोर्टबाबत मात्र अधिकृत माहिती मिळू शकली नाही.
मालवणीमधून गायब झाल्यानंतर हे तिघेही कर्नाटक, हैदाराबाद आणि चेन्नई येथे गेले. तेथे वृत्त वाहिन्यांवर त्यांच्याबाबतच्या बातम्या बघून ते घाबरून गेले. वाजिदने मोहसीन आणि नूर यांना आपण असे काही करणार नसल्याचे सांगितले. त्याला सोडून दोघे गायब झाले, तर वाजिद मुंबईला निघाला होता. वाजिदच्या कुटुंबीयांचा होलसेल लिंबू विक्रीचा व्यवसाय आहे. चार वर्षांपासून तो अयाजच्या संपर्कात होता, असेही बर्गे यांनी सांगितले.

Web Title: 'Fear of Fear of Escape'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.