आरेतील कचरा जीवावर बेतण्याची भीती

By admin | Published: October 3, 2016 02:22 AM2016-10-03T02:22:49+5:302016-10-03T02:22:49+5:30

गोरेगावच्या आरे कॉलनीतील काही भागात कचऱ्याचे ढीगच्या ढीग वाढत आहेत.

Fear of laying of garbage in the house | आरेतील कचरा जीवावर बेतण्याची भीती

आरेतील कचरा जीवावर बेतण्याची भीती

Next

गौरी टेंबकर-कलगुटकर,

मुंबई- गोरेगावच्या आरे कॉलनीतील काही भागात कचऱ्याचे ढीगच्या ढीग वाढत आहेत. या कचऱ्याच्या ढिगांमुळे परिसरात वावरणाऱ्या कुत्र्यांना आणि डुकरांना खाण्यासाठी लोकवस्तीत बिबट्या शिरण्याची धास्ती वर्तविली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा वनविभागाने दिला आहे.
आरेच्या आदर्शनगर बसस्टॉप व नागेश्वर मंदिराजवळ मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिग पाहायला मिळत आहेत. गेला महिनाभर या परिसरात कचऱ्याची गाडीच फिरकलेली नाही. परिणामी कचऱ्यात फेकले जाणारे अन्न खाण्यासाठी कुत्र्याच्या टोळ्यांचा वावर मोठ्या प्रमाणात लोकवस्तीत वाढला आहे, अशी माहिती अनुसूचित जमाती विभागाचे अध्यक्ष सुनील कुमरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यामुळे या कुत्र्याच्या तसेच डुकरांच्या स्वरूपात असलेल्या भक्षाच्या शोधात लोकवस्तीत बिबट्या येण्याची दाट शक्यता वनखात्याकडून व्यक्त केली जात असल्याचे ते म्हणाले. रात्रीच्या वेळी या जंगल परिसरात बिबट्या दिसत असल्याचे कुमरे यांनी नमूद केले. त्यातच या ठिकाणी दिवे नसल्याने अंधार असतो. ज्याचा फायदा घेत हा बिबट्या माणसांवर हल्ला करू शकतो, त्यामुळे इथल्या स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
कचऱ्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करत याच कचऱ्यावरुन वाट काढावी लागते. त्यामुळे विशेषकरून शाळकरी मुलांना विविध आजार होण्याची धास्ती देखील स्थानिकांना वाटत आहे. दत्तक वस्ती योजनेतील कर्मचारी घरोघरी कचरा घेण्यास नियमित येत नसल्याने नागरिकानाच कचरा टाकावा लागतो. दत्तक वस्ती योजनेतील कामगार मनमानी कारभार करतात. यामुळे निर्माण होणाऱ्या डेंगू व मलेरियाच्या डासांमुळे अनेक जण आजारी पडले आहेत, ज्यासाठी याठिकाणी कचरा उचलून धुर फवारणी करण्याची मागणी स्थानिक राहिवाशी संतोष चव्हाण यांनी केली आहे. पालिकेच्या पी दक्षिण विभागाकडून याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र ते लवकर पूर्ण करण्याची विनंती स्थानिकांकडून केले जात आहे.
>परिसरात चार बिबट्यांचा वावर
मतईपाडा, खांबाचा पाडा याठिकाणी नर आणि मादी तर एस आरपीएफ कॅम्पच्या स्विमींग पुलमध्ये देखील नर मादी असे चार बिबटे आरे परिसरात वावरतात. या परिसरात कचरा जमा होत असल्याने तो खाण्यासाठी कुत्रे आणि डुक्कर याठिकाणी येतात. जे बिबटयाचे भक्ष असल्याने त्यांचा पाठलाग करत त्यांना खाण्यासाठी बिबट्या याठिकाणी येतो. पावसानंतर तर सर्वत्र जंगल वाढल्याने तो मोकाट फिरतो. त्यामुळे आमचे रात्रपाळी पथक सतत या परिसरात गस्त घालत असते. त्यामुळे याठिकाणी कचरा जमा होणे हे स्थानिकांच्या जीवावर बेतू शकते.
-कुंडलीक बुरुटे, वनरक्षक, आरे कॉलनी

Web Title: Fear of laying of garbage in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.