बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 03:55 PM2024-11-16T15:55:17+5:302024-11-16T15:57:29+5:30
Maharashtra Assembly Election 2024: सर्वाधिक २९ उमेदवार असलेल्या जळगाव शहरातील दुरंगी वाटणारी लढत झाली चौरंगी.
सुशीलकुमार देवकर
Jalgaon City Assembly Election 2024: भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव शहर मतदार संघात यंदा भाजपातच बंडखोरी झालेली दिसून येत आहे. दुसरीकडे उद्धवसेनेतही बंडखोरी झालेली असल्याने दुहेरी असलेली ही लढत चौरंगी होण्याची शक्यता आहे.
भाजपचे सुरेश दामू भोळे हे यापूर्वी दोन वेळा या मतदार संघातून विजयी झालेले असून आता सलग तिसऱ्यांदा रिंगणात उतरले आहेत. तर उद्धवसेनेतर्फे माजी महापौर जयश्री सुनील महाजन रिंगणात आहेत.
महापालिकेत सुरेश भोळे हे विरोधी पक्षनेते असतानाही खान्देश विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांच्याविरोधात सुनील महाजन यांनी बाजू लढविली आहे. आता ही लढाई विधानसभेच्या रिंगणात पोहोचली आहे. ही लढत दुरंगी होणार अशी शक्यता होती. मात्र भाजपातूनच माजी उपमहापौर डॉ. अश्वीन सोनवणे यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.
नगरसेवक, उपमहापौर म्हणून केलेले काम तसेच कोळी समाजाची असलेली सहानुभूती याबळावर ते किती मते खेचतात? याकडे लक्ष लागले आहे. तर उद्धवसेनेचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनीही बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने महाजन यांची डोकेदुखी वाढली आहे. पाटील हे देखील उपमहापौर पदावर असताना केलेल्या कामाच्या बळावर तसेच मराठा समाजाच्या मतदारांची मते खेचून घेण्याचा प्रयत्नात आहेत. त्यांना किती यश मिळते यावरही या मतदारसंघातील लढतीचे भवितव्य ठरणार आहे.
तब्बल २९ उमेदवार रिंगणात असून त्यात २२ अपक्ष उमेदवार आहेत. ते प्रमुख दावेदारांपैकी कोणाची व किती मते खातात? यावरही विजयाचे गणित अवलंबून आहे. मतदानाची तारीख जसजशी जवळ येत चालली तसतशी लढतीतील चुरस वाढत असून मतदारांचा कौल कोणाला मिळतो हे २३ रोजीच स्पष्ट होणार आहे.
लोकसभेला काय झालं होतं?
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार विरुद्ध भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्यात थेट लढत झाली होती. मात्र त्यात जळगाव शहरातून वाघ यांना १, ३२, १२४. तर पवार यांना ७०, ४०६ मते मिळाली. वाघ यांना जळगाव शहरात ६१ हजार ७१८ मतांचे मताधिक्य मिळाले. या निवडणुकीत जळगाव शहर विधानसभा मतदार संघात महायुतीचे वर्चस्व दिसून आले.
मतदारसंघातील समस्या
एमआयडीसीत मोठे उद्योग नसल्याने रोजगारासाठी तरूणांचे पुणे, मुंबईकडे स्थलांतर, विस्तारीत एमआयडीसीचे भिजत घोंगडे, शहरातून जाणाऱ्या महामार्गावर अपघातांमुळे नागरिकांचे बळी, वळण रस्त्याचे काम मात्र संथगतीने सुरू, विमानसेवा सुरू मात्र मोठ्या धावपट्टीचे, कार्गोहबचे काम मार्गी लागण्याची गरज, मोठ्या शहरांना कनेक्टिव्हीटीसाठी विमानसेवेची वेळ नागरिकांच्या सोयीची नसल्याने अडचण आहे.