राममंदिरावरून दंगलींची भीती; जिल्ह्याजिल्ह्यांत ‘शांतता मार्च’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 03:22 AM2019-02-02T03:22:33+5:302019-02-02T06:52:10+5:30
प्रकाश आंबेडकर; वंचित बहुजन आघाडी सलोखा वाढविणार
औरंगाबाद : सध्या हिंदू-मुस्लिम तेढ वाढविण्याचे प्रयत्न होत आहेत. न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा न करता राममंदिर बांधण्याची तारीख निश्चित करणे असंवैधानिक आहे. त्यातून पुन्हा एकदा जातीय दंगली घडण्याची शक्यता अमेरिकेच्या रॉ एजन्सीनेही व्यक्त केली आहे. किमान महाराष्ट्रात तरी शांतता राहावी यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्ह्या-जिल्ह्यांत ‘शांतता मार्च’ काढले जातील, असे वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे सांगितले.
ते म्हणाले, दोन महिन्यांपासून रा. स्व. संघ व मोहन भागवत यांनी कुठल्याही परिस्थितीत अयोध्येत राममंदिर बांधण्याचा धोशा लावला आहे. न्यायालयाचा निकाल येवो न येवो आम्ही राममंदिराचे बांधकाम सुरू करणार, अशी घोषणा झाली आहे. २१ फेब्रुवारी ही तारीखही जाहीर झाली आहे. मग साडेचार वर्षे हे सरकार काय करीत होते? कुंभकर्णी झोपेत होते. अलीकडेच झालेल्या काही राज्यांच्या निवडणुकांनंतर केंद्रातले सरकार पुन्हा येईल, अशी परिस्थिती दिसत नाही. म्हणून धार्मिक तेढ वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. न्यायालयाचा निकाल लवकर यावा, ही अपेक्षा आहे; परंतु रा. स्व. संघासारख्या संघटना राष्ट्रपतींच्या आधिपत्याखालील प्रशासन मानत नाहीत. त्यांची समांतर प्रशासन व्यवस्था असून, ती संविधानाला व देशाला घातक आहे. म्हणूनच निकाल येईपर्यंत सर्वांनी शांतता ठेवायला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
...तर ‘ते’ यापुढेही ठोकले जातील
रामदास आठवलेंबाबत एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, त्यांनी नीतिमत्ता जोपासावी; अन्यथा ते यापुढेही ठोकले जातील. १० फेब्रुवारीला रिपब्लिकन पक्षाचा जबिंदा लॉन्सवर महामेळावा आहे. त्या पार्श्वभूमीवर आंबेडकर यांनी हे वक्तव्य केले आहे. माझ्यात बाबासाहेब पाहण्यापेक्षा, मला प्रकाश आंबेडकर म्हणूनच जगू द्या, असे ते म्हणाले.
दंगे होऊ देणार नाही : न्यायालयाचा निकाल येईपर्यंतही ही मंडळी थांबायला तयार नाही, हे दुर्दैव असून, परिस्थिती बिघडू नये, याची काळजी वंचित बहुजन आघाडी घेणार आहे. आमच्या जिल्ह्यात शांतता राहील. दंगल होऊ देणार नाही, याची ग्वाही आम्ही देणार असल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली.