महाराष्ट्रातही ‘सुकमा’ची भीती
By admin | Published: April 26, 2017 01:37 AM2017-04-26T01:37:46+5:302017-04-26T01:37:46+5:30
माओवाद्यांनी छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात घडवून आणलेल्या घातपाताची पुनरावृत्ती महाराष्ट्रातही होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नरेश डोंगरे / नागपूर
माओवाद्यांनी छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात घडवून आणलेल्या घातपाताची पुनरावृत्ती महाराष्ट्रातही होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, सरकार नक्षलींना गांभीर्याने घेत नसल्याचे दिसते.
नक्षल्यांनी गेल्या दीड महिन्यात जाळपोळ, हल्ले आणि चकमकीच्या ११ घटना घडवल्या आहेत. ४ महिन्यांत ५ निरपराध नागरिकांची हत्या केली असून, कोणत्याही क्षणी नक्षल्यांकडून गडचिरोली-गोंदियात ‘सुकमा’ची पुनरावृत्ती घडू शकते. मात्र, सरकारी पातळीवर याचे गांभीर्य दिसून येत नाही. महाराष्ट्राच्या नक्षलविरोधी अभियान प्रमुखांसह(एएनओ) अनेक पदे तब्बल अडीच महिन्यांपासून रिक्त आहेत. शिवाय, नक्षलवाद्यांचा बीमोड करण्याची जबाबदारी ज्या एएनओवर आहे, तिथेही दोन डझनपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. त्यात चार पोलीस निरीक्षक आणि डझनभर उपनिरीक्षकांचाही समावेश आहे. एएनओ प्रमुखांचे पदही रिक्त आहे. २०१६ मध्ये या पदावर शिवाजीराव बोडखे हे कार्यरत होते. डिसेंबर २०१६ अखेरीस गृहविभागाने या पदावर एस. शेलार यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला.
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तशी रीतसर बदली प्रक्रिया झाली. मात्र, शेलार यांनी या बदली आदेशाला धुडकावून लावले. तब्बल महिनाभर वाट बघूनही ते येथे रूजू झाले नाहीत. त्यामुळे बोडखे यांनी ४ फेब्रुवारीला त्यांच्या नव्या जबाबदारीचा पदभार स्वीकारला.