अवास्तव शुल्कावर संताप!

By admin | Published: June 6, 2017 04:05 AM2017-06-06T04:05:34+5:302017-06-06T04:05:34+5:30

अवास्तव शुल्क आकारणाऱ्या श्री मावळी मंडळ इंग्रजी शाळेच्या व्यवस्थापनाविरुद्ध पालकांनी सोमवारी एकजूट केली.

Fear of unrealistic charges! | अवास्तव शुल्कावर संताप!

अवास्तव शुल्कावर संताप!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : विद्यार्थ्यांचे गणवेश शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती करून त्यासाठी अवास्तव शुल्क आकारणाऱ्या श्री मावळी मंडळ इंग्रजी शाळेच्या व्यवस्थापनाविरुद्ध पालकांनी सोमवारी एकजूट केली. शाळेच्या मनमानी कारभारावर पालकांनी संताप व्यक्त करून शाळेतील गैरसोयींचा पाढा वाचला.
ठाण्यातील चरई येथे आयोजित पालक सभेमध्ये हायस्कूलच्या व्यवस्थापनाने काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांच्या गणवेशखरेदीबाबत माहिती दिली होती. त्या वेळी गणवेशाचे कापड पालक प्रतिनिधींना दाखवण्यात आले होते. या सुती कापडाचा दर्जा चांगला असल्याने पालक प्रतिनिधींनी होकार दिला होता. सोमवारी प्रत्यक्षात गणवेशविक्रीला सुरुवात झाली, तेव्हा गणवेशाचे कापड सुती नव्हे, तर टेरिकॉटमिश्रित असल्याचे पालकांच्या निदर्शनास आले. काही पालकांनी यावर आक्षेप नोंदवला. १२०० ते १५०० रुपये मोजून पालकांना दिल्या जाणाऱ्या या गणवेशाची बाजारपेठेतील किंमत फारतर ५०० ते ७०० रुपये असल्याचे पालकांनी सांगितले. त्यावरून पालक आणि व्यवस्थापनात चांगलीच जुंपली. काही जागरूक पालकांनी लगेचच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला. हा प्रकार व्यवस्थापनास कळल्यानंतर त्यांनी लगेच आवराआवर करण्यास सुरुवात केली. गणवेश उचलून अन्यत्र नेत असल्याचे पाहून काही पालकांनी आक्षेप नोंदवला. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही गणवेशाचा दर्जा बघू द्या, असा आग्रह त्यांनी केला. त्या वेळी शाळा व्यवस्थापनातील काहींनी आपणास धक्काबुक्की केल्याचा आरोप तुकाराम दिघे यांनी केला.
शाळेतून मिळणारा गणवेश टेरिकॉटमिश्रित कापडाचा असल्याने उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होतो, असा आरोप पालकांनी केला.
शाळा व्यवस्थापनाबाबत पालकांच्या अनेक तक्रारी होत्या. सोमवारच्या प्रकारामुळे पालकांच्या संतापाचा उद्रेक होऊन, त्यांनी गैरसोयींचा पाढाच प्रसारमाध्यमांसमोर वाचला. पालकांच्या तक्रारींची व्यवस्थापन अजिबात दखल घेत नाही. मुख्याध्यापिका किंवा विश्वस्त पालकांना वेळ देत नाहीत. आवारातच मावळी मंडळाचे मोठे मंगल कार्यालय आहे. हे सभागृह परीक्षांच्या काळातही भाड्याने देते. येथे होणाऱ्या कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना त्रास होतो. त्याचप्रमाणे शाळेचे मैदानही भाड्याने दिले जाते. यासंदर्भात पालकांचे कुणीही ऐकून घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला. पालकांचा उद्रेक पाहून मुख्याध्यापिका तृप्ती खारकर यांनी लगेच पालकांची बैठक घेतली. व्यवस्थापन समितीशी बोलून या समस्या सोडवण्याचे आश्वासन त्यांनी पालकांना दिले. यासंदर्भात मुख्याध्यापिका तृप्ती खारकर यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी बैठकीमध्ये असल्याचा निरोप देऊन भेटण्यास नकार दिला.
>मंत्र्यांकडे तक्रार
श्री मावळी मंडळ शाळा व्यवस्थापनाच्या कारभाराबाबत धर्मराज्य पक्षाने सोमवारी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे तक्रार केली. पक्षाचे ठाणे लोकसभा सचिव विनोद मोरे यांनी या निवेदनामध्ये पालकांच्या तक्रारी नमूद केल्या आहेत. मनमानीपणे शाळेचे शुल्क वाढवणे, पालकांसोबत अरेरावी करणे, एखाद्या पालकाने प्रश्न उपस्थित केल्यास त्याच्यावर दबाव आणणे, असे प्रकार शाळेत नेहमीच घडतात. गेल्या १० वर्षांत शाळेने तीनचार वेळा विद्यार्थ्यांचा गणवेश बदलला. हे गणवेश बाजारभावापेक्षा चढ्या दराने विकून ते शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती पालकांना केली जात असल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे.

Web Title: Fear of unrealistic charges!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.