भय्यू महाराज व युवतीत व्हायचे अश्लील संभाषण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2019 08:06 AM2019-01-11T08:06:01+5:302019-01-11T08:07:11+5:30
पोलिसांचा दावा : महाराजांचा नंबर ‘आ हो’ नावाने केला होता सेव्ह
इंदूर (मध्य प्रदेश) : राष्ट्रसंत भय्यू महाराज यांचे आत्महत्या प्रकरण ज्या युवतीभोवती फिरत होते ती युवती व महाराज यांच्यात अतिशय उघडपणे अश्लील संभाषण व्हायचे, असा दावा पोलिसांनी केला आहे. याच युवतीने आधी ‘भय्युजी महाराज मला मुलीसारखे मानत’, असे म्हटले होते. याच कारणावरून भय्युजी महाराजांची मुलगी संतापायची. महाराजांचे दोन विवाह झाले होते. दुसरा प्रेमविवाह होता.
पोलिसांनी सांगितले की, त्या मुलीच्या मोबाईलमध्ये महाराजांचा मोबाईल नंबर ‘आ हो’ या नावाने सेव्ह होता. युवतीच्या मोबाईलमधून डिलीट केलेला डेटा पुन्हा मिळवला गेल्यावर हे स्पष्ट झाले. हे दोघे अतिशय उघडपणे अश्लील संभाषण करायचे याचे पुरावेही मिळाले आहेत. पोलीस उप महानिरीक्षक हरिनारायणचारी मिश्र यांच्यानुसार अहवाल तयार करण्याच्या पायरीपर्यंत पोलीस पोहोचले आहेत. प्राथमिक चौकशीत महाराज आणि ती संशयित युवती यांच्यात अतिशय जवळचे संबंध निर्माण झाले होते हे स्पष्ट झाले आहे.
तपास तुकडीतील अधिकाऱ्यानुसार ही युवती व विनायकदेखील एकमेकांना मेसेजेस करायचे. त्यात युवतीने ‘भाई, आपण प्लॅनमध्ये यशस्वी होऊ की नाही’ असे अनेकवेळा विचारले. त्यावर विनायक तिला प्लॅन यशस्वी होण्याची खात्री द्यायचा. या माहितीनंतर मंगळवारी अचानक एक तुकडी महाराजांच्या घरी ‘शिवनेरी’वर धडकली व तिने पत्नी आयुषी, सेवेकरी पी. डी. उर्फ प्रवीण देशमुख आणि बहीण रेणु, मोनू यांची चौकशी केली. पोलिसांनी महाराजांचे सात मोबाईल फोन जप्त केले. त्यातील डेटा डिलीट झालेला आहे. तो पोलीस पुन्हा मिळवतील.
विष घ्यायची धमकी दिली होती
भय्युजी महाराजांची धाकटी बहीण मोनू उर्फ अनुराधा (५२) हिने विनायक आणि युवतीवर धमकी दिल्याचा आरोप केला आहे. मोनू म्हणाली की, आत्महत्येमागे युवती, विनायक, शरद देशमुख आणि शेखर पंडितचा हात आहे. युवतीने संपूर्ण घर ताब्यात घेतले होते. ती नोकरांना महाराजांची पत्नी असल्यासारखे आदेश द्यायची. जेव्हा महाराज आयुषीशी लग्न करीत होते तेव्हा विनायकने युवतीला घरी बोलावले. मोठी बहीण रेणू आयुषीला दागिने व कपडे देण्यासाठी निघाली होती. संधी मिळताच विनायक युवतीला बेडरूममध्ये घेऊन आला. तिने महाराजांना माझ्याशी लग्न केले नाही तर मी विष घेईन, अशी धमकी दिली. तेव्हा कुटुंबियांनी तिला धक्का देऊन बाहेर काढले.
मोनू हिच्या माहितीनुसार विनायक महाराजांना एकटे असल्याचे पाहताच युवतीला फोन करायचा. त्यांच्याशी दमदाटीने बोलायचा. शेखर आणि विनायक महाराजांना कुटुंबियांपासून दूर करू पाहत होते. विनायक युवतीला घराची मालकीण बनवण्याचे कटकारस्थान करीत होता. मी पोलिसांना पूर्ण माहिती दिली आहे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मोनू हिने केली आहे. पोलीस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही तिने केला आहे.