फेसबुकवरील राजकीय कॉमेंट्सवरून हाणामारी
By admin | Published: January 17, 2017 01:37 AM2017-01-17T01:37:38+5:302017-01-17T01:37:38+5:30
फेसबुकवर एकमेकांविरुद्ध राजकीय कॉमेंट्स टाकल्यावरून दोन गटांत रविवारी (दि. १५) संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मारामारी झाली.
जेजुरी : जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तक्रारवाडी येथे फेसबुकवर एकमेकांविरुद्ध राजकीय कॉमेंट्स टाकल्यावरून दोन गटांत रविवारी (दि. १५) संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मारामारी झाली. दोन्ही गटाकडून फिर्यादी नवनाथ रामदास पिलाणे व संतोष धोंडिबा खेंगरे यांनी एकमेकांविरुद्ध मारामारी व महिलांचा विनयभंगाच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारीवरून जेजुरी पोलिसांनी दोन्ही गटातील १७ जणांवर मारहाण व विनयभंगाचे गुन्हे दाखल केले आहेत.
तक्रारवाडी (ता. पुरंदर) येथे रविवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास फेसबुकवरील कॉमेंट्सवरुन दोन्ही गटात बाचाबाची सुरू झाली. यातून काठ्या व लाथाबुक्क्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात आली. या वेळी दोन्ही गटातील भांडणे सोडविण्यासाठी महिला आल्या होत्या. त्यांनाही मारहाण झाल्याने दोन्ही गटाने एकमेकांविरुद्ध जेजुरी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या. फिर्यादी नवनाथ रामदास पिलाणे यांच्या तक्रारीनुसार सुशील उत्तम खेंगरे, निखिल उत्तम खेंगरे, संतोष धोंडिबा खेंगरे, उत्तम गोपाळ खेंगरे, एकनाथ दत्तात्रय खेंगरे, हृषीकेश नामदेव खेंगरे, सागर मल्हारी खेंगरे, अक्षय मधुकर खेंगरे, ललिता संतोष खेंगरे यांच्या विरोधात मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या गटातील फिर्यादी संतोष धोंडिबा खेंगरे यांच्या तक्रारीनुसार नवनाथ रामदास पिलाणे, संगम रामदास पिलाणे, विक्रम लक्ष्मण जगताप, महेश लक्ष्मण जगताप, कमलाकर रामदास व्हलगुडे, सुरेखा रामदास व्हलगुडे, सर्जेराव दत्तात्रय पिलाणे, सागर बबन पिलाणे, यांच्यावर मारामारी व विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकमेकांना दमदाटी, शिवीगाळ तसेच काठीने मारामारी करून गंभीर स्वरूपाची दुखापत करणे व महिलांचा विनयभंग करणे आदीनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींना अटक करून सासवड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने गुन्ह्याचा तपास होईपर्यंत दोन्ही गटातील आरोपींना जामीन मंजूर केला आहे. (वार्ताहर)