एक पर्व इतिहासजमा...
By Admin | Published: January 19, 2016 10:28 PM2016-01-19T22:28:40+5:302016-01-20T16:27:37+5:30
सकाळी सकाळी फोन आला..कळलं का? अरूण टिकेकर गेले! तो धक्का तर होताच. त्या एका वाक्यानं नव्यानं निर्माण झालेल्या पोकळीची जाणीव देतं झालं. काही सेकंदात डोळ्य़ांपुढं फ्लॅशबॅक तरळला
>- चंद्रशेखर कुलकर्णी
सकाळी सकाळी फोन आला..कळलं का? अरूण टिकेकर गेले! तो धक्का तर होताच. त्या एका वाक्यानं नव्यानं निर्माण झालेल्या पोकळीची जाणीव देतं झालं. काही सेकंदात डोळ्य़ांपुढं फ्लॅशबॅक तरळला. टिकेकरांशी लाभलेलं साहचर्य, त्यांनी माझ्यावर केलेलं प्रेम, माङया पत्रकारितेला दिलेला आकार आणि कायमस्वरूपी बहाल केलेला एका वेगळ्य़ा नात्याचा विशेषाधिकार...एक ना अनेक असंख्य आठवणी दाटून आल्या. मुख्य म्हणजे फ्लॅशबॅकचा वेग किती प्रचंड असू शकतो, या एका नव्या अनुभूतीची जाणीव झाली. ते गेले म्हणजे नेमकं काय झालं, हे सांगण्याला तपशिलाचे असंख्य कंगोरे आहेत. व्यक्तिगत पातळीवर सांगायचं, तर माझा एक मेन्टॉर गेला. त्यांची माझी शेवटची भेट 6 जानेवारीला, ठाण्यात पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात- दिनू रणदिवेंच्या सत्कारानिमित्त याला योग म्हणायचे की आणखी काही ?
महाराष्ट्रापुरतं सांगायचं तर वर्तमान आणि इतिहास यांच्यातला दुवा निखळला. टिकेकरांचं सगळ्य़ात महत्वाचं वैशिष्टय़ म्हणजे या माणसानं सर्वाधिक प्रेम इतिहासावर केलं. त्याचवेळी लोकसत्तासारखं ‘वर्तमान’पत्र वेगळ्य़ा उंचीवर नेऊन ठेवलं. लोकसत्ताचं संपादकपद त्यांच्याकडे आलं, तोवर माधव गडकरींनी आपल्या आक्रमक आणि कमालीच्या लोकाभिमुख स्वभावाचा लेप या वृत्तपत्रवर चढविला होता. टिकेकरांनी त्यांना प्रिय असलेल्या उत्क्रांतीवादाच्या अंगानं हा लेप उतरवला आणि उदारमतवादी निष्पक्षतेचा नवा लेप अलगद चढविला. या प्रक्रियेत त्यांना हवे असलेले बदल त्यांनी पद्धतशीर घडवून आणले. साधनशुचितेच्या बाबतीत प्रसंगी टोकाचा वाटणारा आग्रह त्यांनी आपल्या सहका-यांमध्ये तळार्पयत ङिारपेल, हे कटाक्षानं पाहिलं. ‘धनुर्धारी’ या टोपण नावानं लिखाण करणारे टिकेकरांचे काका आमच्या घरी अनेकदा येत असत. तेव्हा माङया शाळकरी वयात माङो वडील आणि त्यांच्यातल्या संवादातून मला सोलापूरच्या पट्टय़ातल्या टिकेकरवाडीतल्या या संप्रदायाच्या वैचारिक संपन्नतेची किंचित का होईना, चाहूल लागली होती. पुढे मी तुलनेनं खूपच लहान वयात महाराष्ट्र टाइम्समध्ये रुजू झालो, तेव्हा गोविंद तळवलकरांचे सहकारी या नात्यानं अरूण टिकेकर तिथं होतेच. त्यांचा पिंड हा मूलत: गंभीर पत्रकारितेचा. पण टवाळा आवडे विनोद, या समर्थाच्या उक्तीशी ते कधीच सहमत नव्हते. किंबहुना ते स्वत: एखाद्या विनोदावर खळखळून हसायचे. आर.के. लक्ष्मणपासून पुलंपर्यंत अनेकांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते. असा कोणताही बंध-अनुबंध त्यांनी सार्वजनिकरीत्या मिरवला नाही. माङो आहे मजपाशी, ही त्यांची प्रकृती होती. तीत कधी बदल झाला नाही. त्यांच्या स्वभावाचा, लकबींचा, त्यांच्या आवडीनिवडींचा खरा परिचय झाला, तो मी लोकसत्तात रूजू झाल्यानंतरच. त्यांच्याच आग्रहाखातर मी मटा सोडून तिथं गेलो. तोवर शुभदा चौकर, सुहास गांगल, श्रीकांत बोजेवार आणि त्यांच्या सोबत आणखी काही तिशीच्या आतल्या पत्रकारांची टीमच दाखल झालेली होती. या सगळ्य़ांना घडविण्यासाठी, त्यांना स्वत:ला अभिप्रेत असलेल्या मूल्यांचं रोपण करण्यासाठी टिकेकरांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. शैली आमची पण विचार करण्याची पद्धत त्यांची असं कलम त्यांनी केलं आणि निगुतीनं वाढवलंही. मला आठवतंय्. ते एकदा म्हणाले, चारित्र्याची सर्वात पहिली कसोटी कोणती? प्रश्न विचारात टाकणारा होता. पण त्यांनी केलेली उकल साधी-सोपी अगदी व्यवहार्य होती. ऑफिसात दिलेलं गुलाबी व्हाऊचर (त्यातला प्रामाणिकपणा) ही त्याची पहिली कसोटी!
टिकेकर इतिहासात रमायचे. पण त्यांना वर्तमानाचं पुरतं भान होतं. अत्यंत गंभीर स्वरूपाच्या लिखाणालाही ते हिंदी चित्रपटातल्या गाण्यांचे बोल वापरत चटपटीत शीर्षक द्यायचे. त्यांच्या अनेक लेखांचे मथळे त्याची साक्ष देतात. ते इतिहासात जीव रमवायचे पण तरीही ते अस्सल समकालीन होते. क्रिकेटपासून सिनेमार्पयत आणि मधुबालापासून माधुरीपर्यंत अनेक विषयांमध्ये त्यांना रस होता. गतीही होता. कोणत्याही तज्ज्ञाशी ते त्याच्या विषयावर अधिकारानं संवाद साधायचे.
टिकेकरांच्या आवडीनिवडीही साध्या होत्या. माधुरी दीक्षित हा त्यांच्या जिव्हाळ्य़ाचा विषय. त्यांच्या गाडीत मी कायम भीमसेन जोशींचाच आवाज ऐकलाय.
साहब जिसको सुनते है, वो केवल आवाज करता है, बोलता कुछ भी नही, असं त्यांचा ड्रायव्हर बीर सिंग अगदी निव्र्याजपणो सांगायचा. भीमण्णांच्या आलापीवर त्याची प्रतिक्रिया ही अशी असायची..इंग्रजी साहित्यापासून शास्त्रीय संगीतार्पयतचा त्यांच्या रसास्वादाचा आवाका अफाट होता.
पिण्याशी त्यांचा संबंधच नव्हता. खाण्याच्या आवडीही साध्यासुध्या. ते नेमानं घरून डबा आणायचे. त्यात दही, सॅलड आणि सफरचंद हमखास असायचं. अॅन अॅपल अ डे कीप्स डॉक्टर अवे, यावर त्यांचा भलता विश्वास होता. आम्ही कधी-मधी गमतीनं म्हणायचोही..न्यूटननंतर सफरचंदाविषयी इतकं ममत्व क्वचितच कुणी ठेवलं असेल. डिनरवगैरे सोडून काही खायचं झालंच तर त्यांची सर्वात पहिली पसंती उडप्याला असायची.
बाकी त्यांचं अवघं विश्व पुस्तकांशी आणि मन एकोणिसाव्या शतकाशी जुळलेलं होतं. इतिहासाचा विचारही ते थोरांच्या मोठय़ा गोष्टींपेक्षा तेव्हाचं समाजजीवन आणि जनमन या अंगानं मुळातून करायचे. शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा कोथळा कसा बाहेर काढला, याच्या वर्णनापेक्षा शिवकालीन समाज काय खायचा, काय नेसायचा, तेव्हाच्या चालीरीती काय होत्या, यात त्यांना अधिक रस होता. सुधारकांविषयी त्यांना खास ममत्व होतं. टिळक-आगरकर, राजा राममोहन रॉय यांच्यासह काही ब्रिटिश अधिका:यांर्पयत अनेकांविषयी ते भरभरून बोलायचे. त्यांचे किस्से वा त्यांचा द्रष्टेपणा आमच्यार्पयत पोहोचविताना त्यांचे डोळे असीम आनंदानं चमकायचे. नाकावरचा घसरलेला चष्मा वर ढकलण्याची त्यांची लकबही खास होती. गंमत म्हणजे वर्तमानातल्या प्रश्नाला सामोरे जातानाची त्यांची परिभाषा इतिहासाशी नाळ सांगणारी होती. मला आठवतंय, एकदा मी अॅप्रेझलमध्ये माझ्यावर अन्याय झाल्याची तक्रार घेऊन त्यांच्याकडे गेलो. त्यावर मूळ निर्णयात त्यांनी बदल केला नाही. पण मला समजावून सांगताना त्यांनी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि रमाबाईंच्या संवादाचा दाखला दिला. आपण माङयावर अन्याय करता, या रमाबाईंच्या तक्रारीवर न्या. रानडे त्यांना सांगते झाले..माणसावर थोडा अन्याय व्हावा, बरं असतं! यावर आम्ही पामर काय बोलणार?
टिकेकरांनी काही सवयी अगदी सहज अंगावर वागवल्या होत्या. त्यांचे ठराविक फिकट रंगांचे फुल शर्ट, ठराविक दुकानातून घेतलेले शूज, ठराविक शिंप्याकडे जाऊन बेतून शिवलेल्या पॅन्टस..इतकंच कशाला त्यांची लिहिण्याची पॅड््सही स्कॉलर ब्रॅण्डचीच असायची. फाऊंटन पेनांवर त्यांचं विलक्षण जीव. पेनांचे नाना प्रकार, त्याच्या शाईची प्रतवारी अशा अनेक गोष्टींवर ते भरभरून बोलायचे. त्या त्या विषयांमधली अचूक माहिती आणि संदर्भ त्यांच्या ओठांवर असायची.
मुंबई विद्यापीठ, शैक्षणिक वातावरण आणि अध्यापकी हे त्यांच्या जिव्हाळ्य़ाचे आणि चिंतनाचे विषय होते. त्या बाबतीत ते कमालीचे संवेदनशील होते. सनसनाटी निर्माण करण्यापेक्षा संवेदनशीलता जपणारी लेखणी त्यांना अधिक प्रिय होती. त्यांनी राजकारण्यांपासून सुरक्षित अंतर ठेवलं होतं. विलासराव देशमुखांसारख्या एखाद-दोघांनाच ते कमी करता आलं.
टिकेकरांची मते ठाम आणि कठोर होती. पण ती मांडण्याची त्यांची प्रकृती मुक्केबाजीची नव्हे, तर वादपटूची होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी झालेला त्यांचा वैचारिक संघर्ष आणि त्यानंतर सामनाशी झालेली त्यांची जुगलबंदी यात टिकेकरांचं तारतम्य कधीच सुटलं नाही. सभ्यपणोही लढाई कशी लढावी, याचा तो वस्तुपाठ होता. आपल्याला लोकांनी चेह-यानं ओळखावं, या मोहात ते कधीच पडले नाहीत. संपादकीय जबाबदा:यांमधून मुक्त झाल्यानंतरही ते वाहिन्यांच्या कॅमे-याला सोमोरं जाण्याच्या आग्रहाला बळी पडले नाहीत. पण त्यापूर्वी पूर्वी लेखक म्हणून सिद्ध न झालेल्या किमान दोन-अडीचशे जणांना त्यांनी लिहितं केलं. म्हणजे टिकेकरांनी महाराष्ट्राला निदान अडीचशे नवे लेखक मिळवून दिले.
या माणसाच्या साहचर्यात आलेल्या प्रत्येकाला त्यांच्याकडून काही ना काही मिळालं. मला स्वत:ला संपादकीय लिखाणाचं स्वातंत्र्य मिळालं, हे स्वातंत्र्य मिळवावं लागतं, ते मागून मिळत नाही, याचं भानं मिळालं.
ऑफिसातले टिकेकर आणि घरातले टिकेकर खूप वेगळे वाटायचे. त्यांची आई हयात असताना अनेकदा घरी ते दोघेच असायचे. त्यावेळी जर त्यांच्याकडे गेलो, तर ते स्वत: चहा करून आग्रहानं पाजायचे. त्यांचं घरातलं रूप जास्त स्निग्ध होतं.
एखाद्याचं सांत्वन करणं भलतं जिकिरीचं असतं. ज्यांच्यावर प्रसंग ओढावला असेल, त्यांच्या सांत्वनाला जाणं हा आपल्यासाठी त्याहून मोठा बाका प्रसंग ठरतो. मानवी संबंधांच्या कंगो-यांमुळं या सांत्वनाला असंख्य पदर लाभलेत. त्याचा अनुभव मला टिकेकरांच्या जाण्यानं पुन्हा एकवार आला. अशावेळी काय बोलायचं असतं हे माहित नसल्यानं बहुतेक उगे-मुगे राहतात. तोच काही तरी बोलतो. ‘जिंदगी अगर मन की हो जाए तो अच्छा, न हो जाए तो ओर भी अच्छा..’ खरं तर या दोन ओळी म्हणजे जगण्याचं सूत्र तर होत्याच, शिवाय सांत्वनाचा एक नमुनाही होत्याच की! सांत्वनाला तत्त्वज्ञानाचा स्पर्श देणारे कैक नमुने साहित्यात पानोपानी आढळतात.
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे
अकस्मात तोही पुढे जात आहे
हे समर्थानी केलेलं एक सांत्वनच म्हणायचं. पण काही दु:खं अशी असतात की, ज्यांना ना पार असतो, ना अंत. दु:खाचा भाग असा, गुरुपौर्णेमाला ज्यांना आवर्जून फोन करावा अशा मोजक्या नावामधलं एक नाव आज इतिहासजमा झालं !