२३ फेब्रुवारीपासून साक्षी-पुरावे नोंदवणार
By admin | Published: February 5, 2017 12:38 AM2017-02-05T00:38:49+5:302017-02-05T00:38:49+5:30
शीना बोरा हत्येच्या गेले वर्षभर प्रलंबित असलेल्या खटल्याला आता सुरुवात होईल. २३ फेब्रुवारी रोजी सीबीआयच्या पहिल्या साक्षीदाराची विशेष न्यायालयात साक्ष नोंदवली जाणार आहे.
मुंबई : शीना बोरा हत्येच्या गेले वर्षभर प्रलंबित असलेल्या खटल्याला आता सुरुवात होईल. २३ फेब्रुवारी रोजी सीबीआयच्या पहिल्या साक्षीदाराची विशेष न्यायालयात साक्ष नोंदवली जाणार आहे.
विशेष सीबीआय न्यायालयाने पुढील सुनावणी १७ फेब्रुवारीला ठेवली आहे. या दिवशी सीबीआय त्यांच्या संभाव्य साक्षीदारांची यादी बचावपक्षाच्या वकिलांपुढे सादर करेल. त्यामुळे बचावपक्षाला उलटतपासणीसाठी तयारी करण्यास वेळ मिळेल. सुरुवातीला सीबीआयने साक्षीदारांची यादी बचावपक्षाच्या वकिलांना देण्यास नकार दिला. साक्षीदारांच्या सुरक्षेला धोका असल्याची भीती सीबीआयने व्यक्त केली.
‘ही यादी प्रसारमाध्यामांना मिळेल आणि ते साक्षीदारांची मुलाखत घेतील. त्यामुळे केसचे नुकसान होईल. तसेच त्यांच्या सुरक्षेला धोकाही निर्माण होऊ शकतो,’ असे सीबीआयचे वकील भरत बदामी यांनी न्यायालयाला सांगितले. मात्र बचावपक्षांच्या वकिलांनी साक्षीदारांची यादी देण्याचा आदेश सीबीआयला द्यावा, अशी विनंती विशेष न्यायालयाला केली. ‘साक्षीदारांची यादी मिळाली तर उलटतपासणीसाठी तयारी करता येईल,’ असे बचावपक्षांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.
त्यावर न्यायाधीशांनी सीबीआयला संभाव्य साक्षीदारांची यादी सादर करण्याचे निर्देश दिले. ‘यादी दिलीत तर एखादा साक्षीदार अनुपस्थित राहिला तर दुसऱ्या साक्षीदाराला साक्ष देण्यासाठी बोलावता येईल,’ असे म्हणत विशेष न्यायालयाने बचावपक्षाच्या वकिलांना साक्षीदारांची नावे गुपित ठेवण्याचे निर्देश दिले.
शीना बोरा हत्येप्रकरणी सीबीआयने सादर केलेल्या कागदपत्रांपैकी एकही कागदपत्र आरोपींनी स्वीकारलेले नाही. याचाच अर्थ सीबीआयला प्रत्येक कागदपत्राची सत्यता सिद्ध करण्यासाठी संबंधित व्यक्तीला साक्षीदार म्हणून न्यायालयापुढे उपस्थित करावे लागेल. (प्रतिनिधी)