मंडप साकारणाऱ्या ‘त्या’ हातांचा सत्कार
By Admin | Published: February 27, 2017 02:23 AM2017-02-27T02:23:20+5:302017-02-27T02:23:20+5:30
शहरात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा भव्य सभामंडप व स्टेज ‘ओम साई इव्हेंट’ या मंडप डेकोरेटर्सने साकारला होते.
अनिकेत घमंडी,
डोंबिवली- शहरात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा भव्य सभामंडप व स्टेज ‘ओम साई इव्हेंट’ या मंडप डेकोरेटर्सने साकारला होते. त्यासाठी दिवसरात्र झटलेल्या त्यांच्या १२५ कामगारांचा खास सत्कार नुकताच ठाकूर हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला. या सत्काराबद्दल कामगारांनी डेकोरेटर्सचे मंगेश कोळथरकर यांचे आभार मानताना एवढा मोठा सन्मान कोणीच केला नसेल. त्यामुळे मालक आणि आमच्यात एक वेगळेच नाते आहे, अशी भावना कामगारांनी व्यक्त केली.
संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात मंगेश यांचे भाऊ नामदेव यांचा सत्कार शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला होता. मात्र, तो बघताना आपल्यालाही कधी स्टेज मिळेल का, अशी भावना निश्चितच कामगारांच्या मनात आली असणार. ती जाणून घेत आम्ही शुक्रवारी एका कौटुंबिक सोहळ्यात त्यांच्या कलेचा गौरव केला.
प्रसिद्धीपासून वंचित असलेले हे चेहरेही यानिमित्ताने झळकावेत, भव्य कलाकृतींचे खरे शिल्पकार समाजाला माहीत व्हावेत, हीच प्रामाणिक इच्छा यामागे असल्याचे कोळथरकर यांनी सांगितले. दरम्यान, या प्रसंगी संमेलनाचे आयोजक पी.जी. म्हात्रे, संतोष संते व कामगारांचे कुटुंबीय आवर्जून उपस्थित होते. क्षितिज मोमेन्टोचे संजय जोशी यांच्याकडून ट्रॉफी आणि मेडल कर्मचाऱ्यांना देण्यात आले. सूत्रसंचालन सतीश नायकोडे यांनी केले. या प्रसंगी नागरिकांबरोबरच डोंबिवलीमधील रसिक आवर्जून उपस्थित होते.