शौर्यपदक विजेत्यांचा सत्कार
By Admin | Published: September 28, 2016 01:33 AM2016-09-28T01:33:25+5:302016-09-28T01:33:25+5:30
राष्ट्रपतींकडून शौर्यपदक मिळालेल्या राज्यातील सामान्य नागरिकासदेखील भारतीय सेनेतील जवानांप्रमाणे एकरकमी पुरस्कार व मासिक अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या
मुंबई : राष्ट्रपतींकडून शौर्यपदक मिळालेल्या राज्यातील सामान्य नागरिकासदेखील भारतीय सेनेतील जवानांप्रमाणे एकरकमी पुरस्कार व मासिक अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.
भारतीय सैन्य दलातील राष्ट्रपती शौर्यपदक प्राप्त जवानांना किंवा त्यांच्या विधवा-अवलंबितांना एकरकमी पुरस्कार व मासिक अनुदान देण्याची तरतूद आहे.
लष्करी जवानांप्रमाणेच राज्याचा अधिवासी असलेल्या सामान्य नागरिकास राष्ट्रपतींकडून अशोक चक्र, कीर्ती चक्र, शौर्य चक्र असे शौर्य पुरस्कार मिळाले असल्यास त्यांना किंवा त्यांच्या विधवा, विधुर किंवा अवलंबितांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत एकरकमी पुरस्कार व मासिक अनुदान देण्याचा निर्णय आज घेण्यात आला. तसेच माजी सैनिकांच्या मुला-मुलींना देण्यात येणारी शैक्षणिक शुल्क माफीची सवलत मरणोत्तर शौर्यपदक प्राप्त शहीद व्यक्तीच्या दोन अपत्यांसाठी मंजूर करण्यात आली आहे.
नागपूर फिजिओथेरपी कॉलेजसाठी २० पदे
नागपूरच्या शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार (फिजिओथेरपी) महाविद्यालयासाठी २० पदांच्या निर्मितीस मान्यता देण्यात आली. त्यात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, अभिलेखापाल, ग्रंथपाल, वरिष्ठ सहायक, वरिष्ठ लिपिक या पदांचा समावेश आहे. (विशेष प्रतिनिधी)
मीरा-भार्इंदर महापालिकेचे रुग्णालय सरकारकडे
मीरा-भार्इंदर महापालिकेचे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय (टेंबा रुग्णालय) शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्यास मंजुरी देण्यात आली. रुग्णालय चालविण्याची महापालिकेची आर्थिक क्षमता नसल्याने हा निर्णय घेण्यात आला. घोडबंदर ते तलासरीदरम्यान शासनाचे एकही सुसज्ज रुग्णालय नसल्याने मीरा-भार्इंदरमधील रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची गरज असल्याचे समर्थन हा निर्णय घेताना करण्यात आले आहे. या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आता शासकीय सेवेत वर्ग केले जाईल. मात्र त्यांची नियुक्ती नियमानुसार झालेली असावी ही अट असेल. शासकीय सेवेत वर्ग झाल्याचा दिनांक हा नियुक्तीचा दिनांक मानला जाईल. या रुग्णालयासाठी २५ कोटी रुपयांच्या खर्चासही मंत्रिपरिषदेने मान्यता दिली.
चांदा ते बांदा या योजनेसाठी पदनिर्मिती करण्यास मान्यता
चंद्रपूर व सिंधुदूर्ग या जिल्ह्यांत नैसर्गिक साधनसंपत्तीचा यथायोग्य वापर व्हावा यासाठी विशेष पथदर्शी कार्यक्र म (रिसोर्स बेस्ड इंटेंसिव्ह प्लॅनिंग व डेव्हलपमेंट) राबविण्यात येत आहे. या कार्यक्र मांतर्गत चांदा ते बांदा या योजनेसाठी आवश्यक पदनिर्मिती करण्यास आज झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. चांदा ते बांदा ही योजना नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारित आर्थिक विकास करण्याची पथदर्शी योजना आहे.
बहाद्दर रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांना मदत
यवतमाळ येथील एका घटनेत मार्च २००८मध्ये संजय भाऊराव शिंदे या रिक्षाचालकाने लूटमार करणाऱ्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी लुटारूंनी केलेल्या हल्ल्यात ते मृत्युमुखी पडले. या धाडसाबद्दल शिंदे यांना मरणोत्तर शौर्यपदक प्रदान करण्यात आले होते. त्यांच्या कुटुंबीयांस एक विशेष बाब म्हणून एकरकमी पुरस्कार आणि मासिक वेतन सुरू करण्याचा निर्णय मंत्रिपरिषदेने आज घेतला. त्यांच्या पत्नीस पूर्वी देण्यात आलेली २ लाख ४५ हजार रु पये वजा जाता ७ लाख ५५ हजार रु पये मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच त्यांना मासिक अनुदान आणि त्यांच्या अपत्यास शैक्षणिक सवलत मंजूर करण्यात आली.