गर्भातील मुलीचा केला सौदा !
By admin | Published: January 19, 2015 04:35 AM2015-01-19T04:35:30+5:302015-01-19T04:35:30+5:30
बाळ पोटात असतानाच त्याच्या विक्रीचा सौदा केल्याचा प्रकार उल्हासनगरात उघडकीस आला आहे
सदानंद नाईक, उल्हासनगर
बाळ पोटात असतानाच त्याच्या विक्रीचा सौदा केल्याचा प्रकार उल्हासनगरात उघडकीस आला आहे. या दोन महिन्यांच्या मुलीच्या विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधार रत्ना उबाळे अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी आली असता तिला मध्यवर्ती पोलिसांनी गजाआड केले. तिच्याकडून महत्त्वाची माहिती मिळणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. ‘संघर्ष’ या संस्थेच्या सतर्कतेमुळे मुलीच्या विक्रीचा प्रकार उघड झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं.-३, सुभाषनगरमध्ये राहणाऱ्या सुनीता लाहुरी यांनी तिसरे मूल गर्भात असतानाच त्या बाळाची रत्ना उबाळे हिच्या मदतीने विक्री चालविली होती. २० डिसेंबर रोजी सुनीता लाहुरी ही दोन महिन्यांच्या मुलीची ५० हजार रुपयांना विक्री करीत असल्याची माहिती संघर्ष सामाजिक संस्थेने पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी मुंबई येथील जोशी नर्सिंग होमवर छापा टाकून नर्सिंग होमच्या डॉ. मानलिक जोशी, डिग्नी शर्मा, मुलीची आई सुनीता लाहुरी यांना अटक केली होती.
सुनीता लाहुरी हिच्या नवऱ्याला काम नाही. कर्जाचा डोंगर वाढत होता. हाता तोंडाची गाठ पडणे कठीण झाले होते. यातून सुटका करून घेण्यासाठी पोटच्या मुलीची ५० हजार रुपयांत विक्री करण्याचा निर्णय दाम्पत्याने घेतल्याचे उघड झाले आहे. मध्यवर्ती पोलिसांनी संबंधितांवर कारवाई केली.
मुख्य सूत्रदार रत्ना उबाळे पोलिसांनी हुलकावण्या देत होती. न्यायालयात दुपारी तोंडाला रूमाल बांधून आलेल्या रत्ना उबाळे हिला पोलीस ओळखू शकले नाही. मात्र, न्यायालयाच्या लिपिकाने उबाळे हिला तोंडावरील रूमाल काढण्यास सांगितल्यावर उबाळे हिची ओळख पटली. मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी पोफळे, पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांच्या पोलीस पथकाने रत्ना उबाळे हिला भर न्यायालयातून अटक केली आहे. पोलिसांनी यापूर्वीच सुनीता लाहुरी हिच्यासह पतीवर गुन्हा दाखल केला आहे.