स्त्री सन्मान पुरस्कार जाहीर

By admin | Published: November 3, 2016 02:01 AM2016-11-03T02:01:28+5:302016-11-03T02:01:28+5:30

गिरीजा कीर व माधवी कुंटे यांनी ऋजुता फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्त्री सन्मान साहित्य संमेलना’चे विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आले

Female Honor Award | स्त्री सन्मान पुरस्कार जाहीर

स्त्री सन्मान पुरस्कार जाहीर

Next


मुंबई : साहित्यक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सुप्रसिद्ध स्त्री साहित्यिका गिरीजा कीर व माधवी कुंटे यांनी ऋजुता फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्त्री सन्मान साहित्य संमेलना’चे विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. गिरीजा कीर यांना ‘स्त्री सन्मान साहित्य पुरस्कार’ आणि माधवी कुंटे यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
साहित्याच्या नभांगणातील एक लखलखीत नक्षत्र असा लौकिक असलेल्या गिरीजा कीर यांनी कथा, कादंबरी, व्यक्तिचित्रणे, चरित्रे, ललित लेख, मुलाखती, आत्मचरित्र, बालसाहित्य असे बहुविध आकृतिबंध लेखनप्रकार समर्थपणे हाताळले आहेत. त्यांनी पुस्तकांची शंभरी कधीच पार केली आहे. व्यासंग, भाषेवरील प्रभुत्व, उत्कट अभिव्यक्ती ही त्यांच्या लेखनाची बलस्थाने मानली जातात. देश-विदेशात कथाकथनाचे दोन हजारांहून अधिक प्रयोग त्यांनी केले आहेत. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षादेखील होत्या.
ज्येष्ठ साहित्यिका माधवी कुंटे यांची कथा, कादंबरी, ललितलेख व बालसाहित्य या क्षेत्रातील चतुरस्त्र मुशाफिरी निर्विवादपणे लक्षवेधक आहे. समकालीन व भविष्यकालीन समस्यांचा वेध घेणारे सकस लेखन हे त्यांचे वेगळेपण आहे. रंजन व उद्बोधन यांचा समन्वय साधत, त्यांनी आपल्या लेखणीचे विभिन्न साहित्य आविष्कार साकारले आहेत. कथा व कादंबरी यांचा सकारात्मक शेवट करण्याकडे त्यांचा कल अधिक असून, त्यातील आत्मविश्वासाचा सकारात्मक हुंकार अनेकांना ऊर्जा देऊन गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. साहित्यिका डॉ. विजया वाड यांच्या अध्यक्षतेखाली १३ नोव्हेंबर रोजी दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रात राज्यस्तरीय साहित्य संमेलनात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.

Web Title: Female Honor Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.