स्त्री शक्ती नाही, शक्ती स्त्री आहे !
By admin | Published: March 20, 2016 04:31 AM2016-03-20T04:31:44+5:302016-03-20T04:31:44+5:30
आपण स्त्रीशक्ती म्हणतो; पण स्त्री शक्ती नव्हे, तर शक्ती हीच स्त्री आहे. तर स्त्रीकडे ‘इंट्युशन पॉवर’ही जबरदस्त असते. त्यामुळे तिने कोणताही निर्णय घेताना त्या शक्तीचा वापर करावा.
- जया बच्चन यांचे प्रतिपादन
पुणे : आपण स्त्रीशक्ती म्हणतो; पण स्त्री शक्ती नव्हे, तर शक्ती हीच स्त्री आहे. तर स्त्रीकडे ‘इंट्युशन पॉवर’ही जबरदस्त असते. त्यामुळे तिने कोणताही निर्णय घेताना त्या शक्तीचा वापर करावा. तुम्हाला एखादी गोष्ट जेव्हा योग्य वाटेल, तेव्हाच ती करा. कोणीही काही सांगते म्हणून ती करू नका. निर्णय घेतल्यानंतर तो चुकला, तर मागे न वळता त्याचा सामना करा आणि त्यातून मार्गस्थ व्हा, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेत्री खासदार जया बच्चन यांनी शनिवारी महिलांना केले.
‘लोकमत’च्या वतीने देण्यात येणारा वीणादेवी दर्डा जीवनगौरव पुरस्कार नाशिक येथील ज्येष्ठ गांधीवादी आणि सर्वोदयवादी विचारवंत वासंती सौर यांना, तर सौ. ज्योत्स्नादेवी दर्डा कार्यगौरव पुरस्कार बीड जिल्ह्यात महिलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या मनीषा तोकले यांना बच्चन यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. या वेळी लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन खासदार विजय दर्डा, ज्येष्ठ लेखिका शोभा डे, यूएसके फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे, अनिल काटे एंटरप्रायझेसचे संचालक अनिल काटे, आॅरेंज कंट्री ग्रुपच्या संचालक सपना छाजेड, ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई, महाव्यवस्थापक मिलन दर्डा व्यासपीठावर होते. या वेळी ‘लोकमत’तर्फे देण्यात येणारे राज्यस्तरीय सखी सन्मान पुरस्कार कोल्हापूरच्या स्मिता विशाल दीक्षित (शैक्षणिक), पुण्याच्या नीलिमा धायगुडे (शौर्य), अहमदनगरच्या डॉ. सुचेता धामणे (वैद्यकीय), अनुराधा ठाकूर (कला), मुंबईच्या विजया संजय बापट (उद्योग) आणि साताऱ्याच्या ललिता बाबर (क्रीडा) यांना प्रदान करण्यात आले. या वेळी ‘आयकॉन्स आॅफ पुणे (वुमेन) या कॉफीटेबल बुकमागची भूमिकाही विशद करण्यात आली.
जया बच्चन म्हणाल्या, ‘‘स्त्रीसशक्तीकरणाबाबत आज मोठ्या प्रमाणात बोलले जाते; पण स्त्रीसशक्तीकरण म्हणजे नेमके काय, याचा विचार करायला हवा. महिला जेव्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, तिला केवळ पदवीचे शिक्षणच नाही तर संस्कारांचे, व्यवहाराचे शिक्षण मिळेल, तेव्हाच ती खऱ्या अर्थाने सशक्त होईल.’’ विजय बाविस्कर यांनी स्वागतपर प्रास्तविकात पुरस्कार आणि आयकॉन्स आॅफ पुणे (वुमेन)
या कॉफीटेबल बुकमागची भूमिका विशद केली.
जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना वासंतीताई सौर म्हणाल्या, ‘‘आई-वडिलांनी केलेल्या संस्कारांचे हे फळ आहे. संस्कारांतूनच माझी वैैचारिक जडणघडण झाली. केवळ स्वत:पुरता विचार न करता त्यापलीकडे जाऊन इतरांसाठी, समाजासाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली, मार्गदर्शन लाभले. महात्मा गांधींच्या आश्रमात मी लहानाची मोठी झाले, तेथेच घडले; त्यामुळे माझ्यावर बापूंच्या कार्यकर्तृत्वाचा मोठा प्रभाव आहे. आजही गांधींबाबत समाजात अज्ञान व उदासीनता दिसते. त्यांच्याबाबत विचार करणारे विविध मतप्रवाह दिसतात. बापूंबद्दलचे अज्ञान, गैरसमज दूर करून त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचा मी सातत्याने प्रयत्न करीत आहे. सध्या अखिल मानवजात मोठ्या संकटांचा सामना करीत आहे. शाश्वत मूल्यांनी भारलेले बापूंचे विचारच या संकटातून समाजाला तारू शकतात. पुरस्कारातील अर्धी रक्कम मी सेवाग्रामच्या बापूंच्या कुटीला समर्पित करणार आहे. बापूंचे विचार सर्वदूर पोहोचविताना मला कधी अहंकाराचा स्पर्शही होऊ नये, एवढीच ईश्वराकडे प्रार्थना करते.’’
‘प्रभू तू मुझको नम्र बना, अहंकार मुझे छू ना पावे,
मशहुरी की हाव ना होवे, प्रभू तू मुझको नम्र बना’
- तब्बल साडेतीन तास चाललेल्या या कार्यक्रमातून स्त्रीशक्तीची अनेक रूपे समोर आली. स्त्रीशक्तीची रूपे आणि ‘मी जशी आहे, तशी आहे’ या संकल्पनेवरील रॅम्पवॉकने प्रेक्षकांना अंतर्मुख केले. त्याचबरोबर, प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांनी मुलाखतीतून जया बच्चन यांचा जीवनप्रवास आणि विचारपरंपरा उलगडून दाखविली.
समाजनिर्मितीसाठी विविध
स्तरांतून काम करणाऱ्या, निरनिराळ्या प्रकारे झटणाऱ्या महिलांचा आदर्श समाजासमोर आणणे ‘लोकमत’ला महत्त्वाचे वाटते. केवळ शब्दांतूनच नव्हे, तर कृतीतून त्यांचा सन्मान होणे अधिक
सयुक्तिक वाटते. आज महिला प्रत्येक
क्षेत्रात अग्रेसर आहेत. त्यांनी ठसा उमटवला आहे. असे असतानाही अनेक प्रकारच्या
दुर्घटना घडतात. स्त्रियांवर अद्यापही अन्याय-अत्याचार होतात, याबाबत खेद वाटतो. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून पुन्हा विचार करण्याची गरज आहे. याच विचारातून आदर्श असणाऱ्या महिला या समाजासमोर आणण्याची गरज आहे. -खासदार विजय दर्डा