कॉर्पोरेट उद्योगातील महिलांची अशीही भरारी
By admin | Published: June 19, 2016 12:19 AM2016-06-19T00:19:48+5:302016-06-19T00:19:48+5:30
महिला उद्योगाच्या विविध यशोगाथा समाजात प्रचलित आहे. चूल आणि मूल या संकल्पनेला छेद देत, अगदी कॉर्पोरेट उद्योग क्षेत्रांमध्येदेखील महिलांनी भरीव योगदान दिले आहे.
- महेश चेमटे
महिला उद्योगाच्या विविध यशोगाथा समाजात प्रचलित आहे. चूल आणि मूल या संकल्पनेला छेद देत, अगदी कॉर्पोरेट उद्योग क्षेत्रांमध्येदेखील महिलांनी भरीव योगदान दिले आहे. मग या उद्योगात ग्रामीण भागातील ‘स्त्री’ तरी कशी अपवाद ठरू शकेल. महिला सबलीकरणचा नारा जोर धरत असताना, ग्रामीण भागातील महिलांनी एकत्र येऊन सबलीकरणापेक्षा ‘सश्रमीकरणा’वर भर दिल्याचे दिसून आले.
महिलांचा गट म्हटला की, डोळ््यांसमोर येते ते बचत गट, लघुउद्योग. मात्र, कॉर्पोरेट कंपन्यामध्ये एक विशिष्ट विभाग संपूर्णपणे महिलांनी कार्यरत असण्याची उदाहरणे तुरळक आहेत. पुण्यातील शिरवळ गावातील महिलांनी कौटुंबिक जबाबदारी पार पाडत, कॉर्पोरेट कंपनीत महत्त्वाचा कक्ष पूर्ण क्षमतेने व योग्यरितीने कार्यरत ठेवत समाजासमोर आदर्श ठेवला आहे. पुणे आणि सातारा येथील काहीसे मध्यवर्तीचे ठिकाण म्हणजे शिरवळ. साधारण २० वर्षांपूर्वी येथील महिला सर्वसाधारण जीवन जगत होत्या. चूल आणि मूल या चौकटीत त्यांचे जीवन बंदिस्त होते. मात्र, १९९६ साली गोदरेजने घरगुती यंत्रसामुग्री बनविणारा उपक्रम शिरवळमध्ये सुरू केला. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये विशेषत: महिलांमध्ये बदलाचे वारे वाहण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला २० महिलांची पहिली तुकडी कंपनीत रूजू झाली. मात्र, घरच्यांची बंधने, लोक काय म्हणतील? कंपनीत काम करणे हे तुमचे काम नाही? अशा प्रश्नांमुळे त्यांचा धीर खचत होता. अखेर कंपनीने त्या महिलांच्या कुटुंबीयांना कंपनीत बोलावून घेतले. त्यांना या महिलांचे काम कसे चालते? त्यांची सुरक्षितता याबद्दल सांगितले. महिला काम करूनदेखील घर चालवू शकतात, हा विश्वास त्यांच्यात निर्माण केला. त्यामुळे सद्यस्थितीत कंपनीतील वातानुकूलित यंत्र बनविणारा विभाग हा फक्त महिलाच पाहत आहेत. शिवाय कंपनीत २० टक्के महिला कामगार कार्यरत आहेत.
कॉर्पोरेट उद्योगात भरीव योगदान देताना, आपल्या मूलभूत जबाबदारीदेखील त्यांनी सहज पूर्ण केल्या. शिरवळ येथील ग्रामीण भागात कंपनीने ‘स्त्रीशक्ती’च्या मदतीने सुधारणा केल्या आहेत. शिरवळमधील शालेय विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण देणे, शिवाय विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून त्यांना स्वच्छता ठेवण्यासाठी प्रेरित करणे, शिवाय पाणीबचत, ऊर्जा बचतीचा संदेश देणे असे विविध उपक्रम येथे राबवण्यात येत आहेत. त्याचबरोबर, गावामध्ये वीजबचत, स्वच्छता अभियान यावर विविध चर्चासत्रे आणि वक्तृत्व स्पर्धा पार पडतात. त्याचबरोबर, मुलांमध्ये क्रीडागुण जोपासण्यासाठी विविध मैदानी स्पर्धांचे आयोजनही करण्यात येते. एकीचे बळ ही संकल्पना नवीन नाही, पण आजपर्यंत ही संकल्पना कागदोपत्रीच दिसून आली. कित्येक उदाहरणे समोर असूनदेखील नजर चुकवित म्हणा वा जाणीवपूर्वक डोळेझाक करण्यात समाजाचा हातखंडा आहे. तूर्तास या कॉर्पोरेट उद्योगामध्ये ग्रामीण भागातील स्त्रियांनी दाखवलेली दुर्दम्य इच्छाशक्ती खूप काही सांगून गेली आहे.
म्हणून मन प्रसन्न राहाते
गेली दीड वर्षे मी काम करत आहे. येथे काम करताना कोणत्याही स्वरूपाची भिती नाही. मुळात येथील सर्व कर्मचारी आणि अधिकारी वर्ग खूप चांगले सहकार्य करतात, शिवाय घरात असणारा नीटनेकेपणा, स्वच्छता या गोष्टी येथे असल्याने काम करत असताना मन प्रसन्न राहते. घरापासून जवळ असल्याने त्याचा फायदा होतो, असे मत गुणवत्ता चाचणी विभागातील झैबा शेख हिने व्यक्त केले.