अंत्यसंस्कारासाठी न गेल्याने कुुटुंब ७ वर्षे बहिष्कृत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 10:54 PM2017-07-21T22:54:12+5:302017-07-21T22:54:12+5:30
एका नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला कोणी उपस्थित न राहिल्याने एका कुटुंबाला समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या सात वर्षापासून
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 : एका नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला कोणी उपस्थित न राहिल्याने एका कुटुंबाला समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या सात वर्षापासून बहिष्कृत करण्यात आल्याचे घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अखिल महाराष्ट्र घडशी समाजाच्या नऊ पदाधिकाऱ्यांविरुद्ध सामाजिक बहिष्कार केल्याप्रकरणी शनिवारी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचार पिडीताने त्याविरुद्ध पोलिसांत धाव घेतल्याने या प्रकाराला वाचा फुटली आहे.
सामाजिक बहिष्कारापासून संरक्षणासाठी गेल्यावर्षी कायद्याची निर्मिती केल्यानंतर याबाबत मुंबईत दाखल झालेला हा पहिला गुन्हा आहे. आता यातील संशयित आरोपीवर पोलीस कधी कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दादर (प) येथील शिवाजी मंदिराजवळील स्वाती मनोर हौसिंग सोसायटीमध्ये रहात असलेले प्रभाकर जिजाबा भोसले (वय ६५) हे इतर मागासवर्गियातील घडशी समाजातील आहेत. सनई चौघडा वाजविण्याचा त्यांचा पारंपारिक व्यवसाय आहे. २०१०मध्ये एका नातेवाईकाचा मृत्यू झाला होता. मात्र काही कारणानिमित्य ते त्याच्या अंत्यसंस्काराला जावू शकले नव्हते. ही बाब घडशी समाजाच्या पदाधिकाऱ्यांना जिव्हारी लागली. त्यामुळे त्यांनी प्रभाकर भोसले व त्यांच्या कुटुंबियाला समाजापासून बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतला. गेली ७ वर्षे समाजाचे कोणीही त्यांच्याशी कसलाही व्यवहार करीत नसून संपर्क तोडलेला आहे. समाजाच्या कार्यक्रमात त्यांना सहभागी होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या बहिष्कारामुळे अपमानास्पद वाटत असल्याने अखेर भोसले यांनी त्याबाबत समाजातील ९ पदाधिकारी व सदस्याविरुद्ध शिवाजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण अधिनियम २०१६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.