कुंपणच ‘वन’ खातेय!
By Admin | Published: July 3, 2017 04:20 AM2017-07-03T04:20:13+5:302017-07-03T04:20:13+5:30
एकीकडे राज्यभरात वृक्षलागवडीचे मिशन जोरात सुरू असताना औरंगाबादपासून सुमारे २५ कि.मी. अंतरावर सारोळा जंगलात मोठ्या
गजानन दिवाण/ लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : एकीकडे राज्यभरात वृक्षलागवडीचे मिशन जोरात सुरू असताना औरंगाबादपासून सुमारे २५ कि.मी. अंतरावर सारोळा जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. साधारण दहा ट्रॅक्टर झुडपी जंगल साफ केलेले आढळल्याने वनप्रेमींमध्ये खळबळ उडाली आहे.
मार्च महिन्यात पांढऱ्या टोपीचा भारीट अर्थात व्हाइट कॅप्ड बंटिंग या देखण्या पक्ष्याचे दर्शन झालेला हाच परिसर. साधारण १६० पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती या परिसरात आढळतात. बाभूळ, करवंद आणि आमटी हे झुडपी वृक्ष येथे मोठ्या प्रमाणात आढळतात. एकीकडे राज्यभरात वृक्षलागवड मोहीम जोरात सुरू असताना आणि त्याचे तेवढेच कौतुक होत असताना सारोळा जंगलात मात्र गेल्या दोन दिवसांपासून वृक्षलागवडीचाच मुहूर्त शोधून मोठी वृक्षतोड केली जात आहे. रविवारी सकाळी पक्षीमित्र पंकज शक्करवार, रूपाली शक्करवार आणि अश्विनी मोहरीर या परिसरात गेले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.
रस्त्याच्या बाजूला लावण्यात आलेल्या झाडांना कुंपण करण्यासाठी झाडांची ही कत्तल केली जात आहे. बाभूळ, करवंद आणि आमटीचे हे झुडपी जंगल साफ केले जात असल्याचे पंकज शक्क्रवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
पक्ष्यांचा जीव धोक्यात
बटेर, तितर आणि मोर यांसारख्या पक्ष्यांसाठी हा परिसर ओळखला जातो. हे जंगल साफ करून परिसरात आढळणाऱ्या १६० वर पक्ष्यांच्या प्रजातींचा अधिवास धोक्यात आणला जात असल्याची प्रतिक्रिया पक्षीमित्र पंकज शक्करवार यांनी दिली.
म्हणे, कुंपण
घालत आहोत!
औरंगाबादचे रेंज फॉरेस्ट आॅफिसर शशिकांत तांबे रविवारी औरंगाबादेतील मिलिट्री परिसरात वृक्षारोपण मोहिमेत व्यस्त होते. या वृक्षतोडीबाबत ते म्हणाले, सारोळा जंगल परिसरातील रस्त्याच्या बाजूला गेल्यावर्षी साधारण १२०० झाडे लावण्यात आली होती. त्या झाडांना गेल्या दोन दिवसांपासून कुंपण घातले जात आहे. यासाठी वाळलेली झाडे तोडली जात असल्याचे त्यांनी सांगितले.