पायधुनी मार्ग वाहतुकीसाठी मोकळा
By admin | Published: July 21, 2016 02:26 AM2016-07-21T02:26:29+5:302016-07-21T02:26:29+5:30
पावसाळ्यात उघड्यावरील खाद्यपदार्थांमुळे मुंबईत गॅस्ट्रोचे रुग्ण वाढत आहेत़
मुंबई: पावसाळ्यात उघड्यावरील खाद्यपदार्थांमुळे मुंबईत गॅस्ट्रोचे रुग्ण वाढत आहेत़ त्यामुळे पालिकेने अशा अनधिकृत फेरिवाल्यांविरोधात कारवाई सुरु केली आहे़ या अंतर्गत पायधुनी परिसरातील पायधुनी मार्ग व इब्राहिम मर्चंट मार्गावरील फेरीवाल्यांचे सामान आज जप्त करण्यात आले़ यामुळे येथील वाहतुकीचा मार्गही मोकळा झाला आहे़
अनधिकृत फेरीवाल्यांनी पदपथाबरोबरच रस्त्यावरही कब्जा केला आहे़ यामुळे शहरात भागात विशेषत: मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे़ पावसाळ्यात पादचाऱ्यांना या रस्त्यावरुन चालणेही मुश्कील होत आहे़ याबाबत वारंवार तक्रार येत होती़ तसेच उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊन मुंबईकर आजारी पडत असल्याने बी विभाग कार्यालयामार्फत ही कारवाई करण्यात आली़
२० कामगार व अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह येथील फेरीवाल्यांचे सामान जप्त करण्यात आले़ हातगाड्या व सामान पालिकेच्या गोदामात टाकण्यात आले आहे़ ५० फेरीवाल्यांचे सामान या कारवाईतून जप्त करण्यात आले़ यामुळे पायधुनी मार्ग वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे़ अशी कारवाई अन्य विभागांमध्येही यापुढे सुरु राहणार आहे़ (प्रतिनिधी)