माळीण पुनर्वसनात भिंतींना तडे, रस्ते खचले
By admin | Published: June 25, 2017 05:56 PM2017-06-25T17:56:27+5:302017-06-25T17:56:27+5:30
माळीण पुनर्वसनात पहिल्याच पावसात ठिकठिकाणी भराव खचल्याने भिंतींना तडे गेल्याने रस्ते खचले
ऑनलाइन लोकमत
घोडेगाव, दि. 25 - माळीण पुनर्वसनात पहिल्याच पावसात ठिकठिकाणी भराव खचल्याने भिंतींना तडे गेल्याने रस्ते खचले, ड्रेनेज लाईन उखडल्या आणि गटारे छोटी झाल्याने पाणी वाहिले. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, 8-10 कुटुंबे पुन्हा पत्र्याच्या शेडमध्ये राहण्यास जाण्याची मागणी करू लागले आहेत.
30 जुलै 2014 रोजी माळीण गावावर डोंगर कोसळून 44 कुटुंबातील 151 लोक मृत्युमुखी पडले. रात्रभर पडलेल्या पावसामुळे साचलेले पाणी डोंगराला पडलेल्या भेगांमध्ये साचून डोंगराचा कडा कोसळला. यातून नशीबाने बचावलेल्या ग्रामस्थांचे नवीन माळीण वसून कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात आले आहे. यातील 67 घरांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या हस्ते झाला.
परंतु पहिल्याच पावसात या गावाची दयनीय अवस्था झाली आहे. दि. 24 रोजी झालेल्या संततधार पावसाने अनेक घरांचे भराव खचले, रस्त्यांना तडे गेले. भिंतींना तडे गेले, घरांच्या पायऱ्या खचल्या, ड्रेनेजच्या पाईपलाईन उखडल्या आहेत. गटारांचे चेंबर खचले आहेत. तसेच अंगणवाडीजवळील मोठी भिंत तुटल्याने शाळेला मोठा धोका निर्माण झाला आहे. शाळेमागील भराव वाहून आल्यामुळे व बाजूच्या भिंतीला तडे गेल्याने तेथे शाळा भरविता येणार नाही. या परिस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या आरसीसी भिंती घरांवर पडल्या तर गावावर मोठे संकट येऊ शकते. यासाठी काही लोक पुन्हा पत्र्याच्या शेडमध्ये राहायला जायची मागणी करू लागले आहेत. सुमारे 8-10 कुटुंबांनी तेथून बाहेर पडण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, ही परिस्थिती समजल्यानंतर तहसीलदार रवींद्र सबनीस, नायब तहसीलदार विजय केंगले यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
शाळेजवळ राहणाऱ्या लोकांची पत्रा शेडमध्ये राहायची व्यवस्था करावी तसेच शाळा देखील पुन्हा जुन्या जागेच भरवली जावी. पावसाळा संपल्यानंतर कामे पुर्ण करून शाळा भरावी. सदर काम सुरू असतानाच अनेक त्रुटी निदर्शनात आणून दिल्या होत्या असे माजी सरपंच दिगंबर भालचीम यांनी सांगितले.