सराफ चालवित असलेली भिशी अनियंत्रित ठेवी बंदी वटहुकूमाबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 05:57 AM2019-02-27T05:57:52+5:302019-02-27T05:57:54+5:30
हप्त्यांवर सोने विकणे कायद्याच्या चौकटीतच
- सोपान पांढरीपांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातील सराफी दुकानांकडून सोने विक्रीसाठी चालविल्या जाणाऱ्या भिशी या अनियंत्रित ठेवी बंदी वटहुकूमाच्या कक्षेबाहेर आहेत, असल्याचा निर्वाळा इंडियन बुलियन व ज्वेलरी असोसिएशनचे महासचिव सुरेंद्र मेहता यांनी दिला आहे.
भारतात सोन्याला अनन्यसाधारण संपत्तीमूल्य असल्याने प्रत्येकाला ते विकत घेण्याची इच्छा असते. पण हा मौल्यवान धातू एकरकमी खरेदी करता येत नाही. अशावेळी सराफा दुकानदार भिशीद्वारे सुलभ हप्त्यांवर सोने विकतात. यात ग्राहक ११ महिने नियमित हप्ते भरतो व १२ व्या महिन्यात १२ हप्त्यांच्या किमतीचे सोने/दागिने त्याला मिळतात. गेल्या बुधवारी राष्ट्रपती कोविंद यांनी अनियंत्रित ठेवी बंदी वटहुकूम जारी केल्यानंतर या भिशींवरही बंदी आल्याची चर्चा सुरू झाली. याबाबत सुरेंद्र मेहता म्हणाले की, आयकर कायद्याने सराफ जे हप्ते ग्राहकांकडून घेतात ते ठेव म्हणून नव्हे तर अॅडव्हान्स फॉर सेल म्हणून स्वीकारतात. कायद्याने या अनामत रकमेचा व्यवहार ३६५ दिवसात पूर्ण करावा लागतो.
या भिशीची विक्री १२ व्या महिन्यात पूर्ण होत असल्याने ती कायद्याच्या चौकटीतच आहे. या रकमेवर व्याज देता येत नाही मग १२ व्या हप्त्याचे काय यावर मेहता म्हणाले कीे, त्याची तरतूद सराफ १० टक्के डिस्काऊंट वा घडणावळ माफ करून करतात. यामुळेही या भिशीला हा वटहुकूम लागू होत नाही. देशात जवळपास चार लाख सराफी दुकाने असून त्यापैकी ५० ते ६० टक्के दुकानदारांचा व्यवसायच भिशीवर अवलंबून असतो.
भिशी म्हणजे बॅचलर्स कॉन्ट्रीब्युशन
भिशीचा खरा अर्थ बॅचलर्स कॉन्ट्रीब्युशन (बीसी) असा आहे. पूर्वी सैन्यातील जवान अशा पद्धतीने बचत करून वर्षातून एकदा सणासुदीला मोठी रक्कम घरी पाठवत असत. त्याच बीसीचा अपभ्रंश होऊन पुढे भिशी हा शब्द प्रचलित झाला आहे.