शेतीला मिळणार गाळाचा कस
By admin | Published: May 20, 2017 08:40 AM2017-05-20T08:40:53+5:302017-05-20T08:40:53+5:30
दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या व तलावांच्या साठवणूक क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या व तलावांच्या साठवणूक क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. ही बाब विचारात घेवून जिल्ह्यात पाणीटंचाई असणाऱ्या तालुक्यांमध्ये लोकसहभागातून ‘गाळ मुक्त धरण, गाळ युक्त शिवार’ उपक्रम राबविणार येणार आहे. या उपक्रमाद्वारे ५८ गावांमध्ये १०० सिंचन प्रकल्पांमधील गाळ काढून शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शेतीला धरणातील गाळ मिळणार असल्यामुळे मातीचा कस अधिक वाढणार आहे. धरण आणि जलसाठ्याच्या साठवण क्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टिने धरणातील गाळ काढून तो शेतात वापरण्यासाठी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना महाराष्ट्र शासनाने नुकतीच सुुरु केली.
या योजनेंर्तगत जिल्ह्यातील लघुपाटबंधारे, तलाव, साठवण तलाव, गावतलाव, पाझर तलाव इत्यादी १०० तलावातील गाळ स्थानिक शेतकऱ्यांना मोफत मिळणार असून त्यांना तो स्वखर्चाने न्यावा लागणार आहे. गाळ काढण्यासाठी लागणारी यंत्र सामुग्री व इंधनवरील खर्च शासनामार्फत करण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत जिल्ह्यात लोकसभागातूनही गाळ काढण्याची कामे ५८ गावांमध्ये सुरु आहे. यामध्ये खामगाव तालुक्यातील लाखनवाडा-रायघर, शिर्ला नेमाने, नागझरी बु. या ३ गावांचा समावेश आहे. अश्या प्रकारे बुलडाणा तालुक्यातील ११,चिखली ३,देऊळगावराजा १०,मेहकर ७, लोणार ७, सिंदखेडराजा ४, मोताळा २, मलकापूर ४, नांदुरा ३, जळगाव जमोद तालुक्यात ४ गावांमध्ये गाळ करण्याचे काम सुुरु करण्यात आले आहे. या योजनेनुसार गाळ काढण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. शासनाने या योजनेवर पुढील चार वर्षात ६२३६ कोटी रुपये टप्याटप्याने खर्च करण्याचे निश्चित केलेले आहे. या योजनेसाठी तलावालगतच्या शेतकऱ्यांनी गाळ काढण्याच्या मागणीचे प्रस्ताव संबधीत गावातील सरपंच, प्रशासनकीय संस्था किंवा स्थानिक मंडळामार्फत संबधीत तहसिलदारांकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
तीन वर्षात निघाला ४६.३६ लाख घ.मी.गाळ
जिल्ह्यातील कायमस्वरुपी पाणीटंचाई लक्षात घेता, त्यावर तोडगा काढण्यासाठी जलयुक्त शिवाय योजनेत लोकसहभागातून गाळ काढण्याच्या विविध मोहीम जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागात राबविण्यात आल्या होत्या. यात गत तिन वर्षात तब्बल ४६.३६ लाख घ.मी. गाळ काढून तो शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यात आला.
गाळ काढण्यासाठी झाली ६०८ कामे
सन २०१५-१६ या वर्षात गाळ काढण्याच्या मोहीमेंतर्गत लोक सहभागातून खोलीकरण व रुंदीकरणाची ५४९ कामे करण्यात आली. यात ४०.५९ लाख घ.मी.गाळ काढण्यात आला. तर सन २०१६-१७ या वर्षात १४ कामे पुर्ण करण्यात आली असून २.२६ लाख.घ.मी.गाळ काढण्यात आला. २०१७-१८ मध्ये गाळ काढण्याची ४५ कामे सुरु असून आतापर्यत ३.५१ लाख घ.मी.गाळ करण्यात आला आहे.