‘स्वरांपासून ईश्वरापर्यंत’ कार्यक्रमाची मेजवानी
By admin | Published: March 1, 2017 02:18 AM2017-03-01T02:18:00+5:302017-03-01T02:18:00+5:30
एस.एन.डी.टी. मैदानात २५ फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या विशेष सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांची सांगता १ मार्च रोजी होणार आहे.
मुंबई : श्री सांताक्रुझ जैन तपगच्छ संघाला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जुहू तारा रोडवरील एस.एन.डी.टी. मैदानात २५ फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या विशेष सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांची सांगता १ मार्च रोजी होणार आहे. दरम्यान, मंगळवारी संध्याकाळी ‘स्वरांपासून ईश्वरापर्यंत’ या धार्मिक कार्यक्रमाने या उत्सवाची शोभा वाढवली. अतुल शाह यांच्या नेतृत्वाखाली या उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
महोत्सवाची सुरुवात शनिवारी ईश्वरभक्तीच्या कार्यक्रमाने झाली. त्यामध्ये कलाकार म्हणून पार्थिव गोहिल व त्यांचे सहकारी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार आणि नगरसेविका व उपमहापौर अलका केरकर उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जैन समाज उपस्थित होता. श्री सांताक्रुझ जैन तपगच्छ संघाचे बच्चू शाह, हिरजी शाह, पंकज व्होरा या प्रमुखांनी परिवारासमवेत महोत्सवात हजेरी लावली. महोत्सवांतर्गत सांताक्रुझ विभागात रविवारी रथयात्रा काढण्यात आली तर सोमवारी सायंकाळी मोठा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.
बुधवारी, १ मार्चला श्री कुंथुनाथ जिनालयाच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा सोहळा सादर होणार आहे. हे कार्यक्रम आचार्य श्री राजेंद्रसुरीश्वरजी महाराज, आचार्य श्री मेघदर्शनसुरीश्वरजी महाराज तसेच राष्ट्रसंत आचार्य श्री पद्मसागरसुरीश्वरजी महाराजांचे शिष्यरत्न प.पु. श्री नयपद्मसागरजी महाराज यांच्या देखरेखीखाली होत आहेत. (प्रतिनिधी)