रंगोत्सवात यंदाही साजरी झाली कोरडी धुळवड
By admin | Published: March 14, 2017 02:02 AM2017-03-14T02:02:16+5:302017-03-14T02:02:16+5:30
पाणीटंचाई सुरूवात होत असताना पर्यावरणाबद्दल जागरूक असलेल्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या शहरांसह जिल्ह्यातील इतर ठिकाणी यंदाही पाण्याचा
टीम लोकमत , ठाणे
पाणीटंचाई सुरूवात होत असताना पर्यावरणाबद्दल जागरूक असलेल्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या शहरांसह जिल्ह्यातील इतर ठिकाणी यंदाही पाण्याचा अपव्यय टाळून कोरड्या आणि विशेषत: नैसर्गिक रंगाचा वापर करत कोरडी धुळवड साजरी करण्यात आली. रविवारी संपूर्ण ठाणे जिल्ह्यात सार्वजनिक आणि खाजगी मिळून ४,६८६ होळ्यांचे दहन करण्यात आले. इतर सण-उत्सवांप्रमाणेच होळी आणि धुलिवंदनाचा सण ठाणे जिल्ह्यात सामाजिक भान राखत उत्साहात आणि आनंदात साजरा झाला.
गेली काही वर्षे पाण्याचे असलेले दुर्भिक्ष्य लक्षात घेता धुलिवंदनाच्या दिवशी पाण्याचा वापर टाळण्याचे आवाहन केले जात असे. तुलनेने यंदा पाणीटंचाईला नुकतीच सुरूवात झालेली असली, तरी पुढील काळात ती वाढण्याची शक्यता असल्याने त्याचे भान राखत ठाणेकरांनी पाण्याचा कमीत कमी वापर केला. काही मोजक्या वस्त्या वगळता पाण्याचा, फुग्यांचा वापर कमी झाला. लहान मुले वगळता पिचकाऱ्यांच्या वापरावरही मर्यादा आल्याचे दिसून आले. काही सामाजिक संस्थांबरोबर सोसायट्यांनीही पाणी वापराच्या निर्बंधाबाबत आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. धूळवडही दुपारपर्यंत साजरी न करता ठराविक मर्यादित वेळेतच साजरी झालेली पाहायला मिळाली. काही ठिकाणी डीजेच्या तालावर तरूणाई थिरकली, तर काही संस्थांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात रंगलेल्या होळीवर आधारित नृत्ये, लावण्यांचा युवा वर्गाने आनंद लुटला. कोरडी धुळवड खेळल्यानंतर आपल्या ग्रुपचा सेल्फी मोबाईलमध्ये टिपण्यात अनेक जण दंग होते. शहरात नाक्यानाक्यांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. सकाळपासूनच सर्व दुकाने आणि हॉटेल बंद होती. बस आणि धुळवड खेळलेले बाईकस्वार याशिवाय कोणाची वर्दळ नव्हती. अनेकांनी दुपारनंतर आपापल्या ग्रुपसोबत बाहेर पडून टपरी, धाब्यांवर जेवण, नाश्ताचा आनंद लुटला. काही सोसायट्यांमध्ये मिठाईचे वाटप करण्यात आले.
श्रीरंग सोसायटी, कळव्यातील मनीषानगर, नारळवाला चाळ यांसह काही ठिकाणी रविवारी रात्री पर्यावरणस्नेही होळीचे दहन झाले. ब्रह्मांड सोसायटी तसेच पर्यावरण दक्षता मंचाच्यावतीने टाकाऊ वस्तूंची होळी करण्यात आली.