दुर्गसाहित्य संमेलन सिंहगडावर रंगणार!

By admin | Published: February 18, 2015 01:19 AM2015-02-18T01:19:12+5:302015-02-18T01:19:12+5:30

५व्या दुर्गसाहित्य संमेलनामध्ये यंदा दुर्गविषयक विविध परिसंवाद, चर्चासत्र, मुलाखत, व्याख्याने, दुर्गदर्शन, प्रदर्शन, स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

Festive gathering will play on Sinhagad! | दुर्गसाहित्य संमेलन सिंहगडावर रंगणार!

दुर्गसाहित्य संमेलन सिंहगडावर रंगणार!

Next

मुंबई : गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाच्या वतीने आयोजित ५व्या दुर्गसाहित्य संमेलनामध्ये यंदा दुर्गविषयक विविध परिसंवाद, चर्चासत्र, मुलाखत, व्याख्याने, दुर्गदर्शन, प्रदर्शन, स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. हे संमेलन २० ते २२ फेब्रुवारी रोजी पुणे येथील सिंहगडाच्या पायथ्याशी होत असून, तेथे ‘गप्पांगण’ कार्यक्रम रंगणार आहे.
ज्येष्ठ पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. अरविंद जामखेडकर हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत; तर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे निमंत्रक आणि ज्येष्ठ दुर्गयात्री जयप्रकाश सुराणा स्वागताध्यक्ष आहेत. या तीन दिवसीय सोहळ्यात ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, समारोप सोहळ्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दुर्गसाहित्य संमेलनाच्या निमित्ताने दरवर्षी दिला जाणारा ‘दुर्ग साहित्य पुरस्कार’ ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक सदाशिव टेटविलकर यांना जाहीर झाला आहे. रोख ११ हजार रुपये आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार त्यांना संमेलनात प्रदान करण्यात येईल.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची दुर्गविषयक मुलाखत हे यंदाच्या संमेलनाचे खास आकर्षण आहे. ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे गनिमी काव्याचे युद्ध’ या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे. संमेलनात दुर्ग आणि निसर्ग, दुर्ग आणि शिल्प या दोन विषयांवर परिसंवाद रंगणार आहेत. या परिसंवादांत डॉ. श्रीकांत इंगळहळ्ळीकर, डॉ. आनंद पाध्ये, डॉ. सतीश पांडे, डॉ. हेमंत घाटे, महेश तेंडुलकर, सदाशिव टेटविलकर, डॉ. गो. बं. देगलुरकर इ. तज्ज्ञ वक्ते सहभागी होणार आहेत.
पन्नास वर्षांपूर्वी झालेल्या ‘दहा दिवस दहा दुर्ग’ या मोहिमेतील सहभागी ज्येष्ठ दुर्गरोहींशी आणि ‘सिंहगडाचे वारस’ या विषयांतर्गत नरवीर तानाजी मालुसरे, नावजी बलकवडे आणि लोकमान्य टिळक यांच्या वंशजांशी चर्चेचे खास कार्यक्रम यंदाच्या संमेलनात आहेत. यंदाच्या संमेलनामध्ये गोनीदांच्या ‘पवनाकाठचा धोंडी’ या कादंबरीचे अभिवाचन केले जाणार आहे. संमेलनस्थळी सह्याद्रीवरील चित्र-छायाचित्र आणि गिर्यारोहणातील साहित्यावर आधारित अशी तीन प्रदर्शने भरविली जाणार आहेत. पुण्यातील राष्ट्रीय कला अकादमीचे कलाकार संमेलनस्थळी गडदुर्गावरील रांगोळी काढणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Festive gathering will play on Sinhagad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.