वसंताच्या आगमनाचा रंगला फुलोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2017 01:19 AM2017-03-02T01:19:55+5:302017-03-02T01:19:55+5:30
‘पळसाला पाने तीनच’ या म्हणीमुळे प्रसिद्ध झालेले पळसाचे झाड सध्या पाच पाकळ्यांच्या लालकेशरी भडक रंगाच्या फुलांनी भरले आहे.
नीलेश काण्णव,
भीमाशंकर- ‘पळसाला पाने तीनच’ या म्हणीमुळे प्रसिद्ध झालेले पळसाचे झाड सध्या पाच पाकळ्यांच्या लालकेशरी भडक रंगाच्या फुलांनी भरले आहे. पोपटाच्या चोचीप्रमाणे असणारी ही फुले लांबून पाहिली असता जंगलातून लाल ज्वाला बाहेर येत असल्याचा भास होतो.
शिशिराची गळती संपून वसंत पालवी झाडांना फुटू लागली आहे. वसंताच्या आगमनाबरोबर झाडांवर रंगीबेरंगी फुलांनी उधळण सुरू झाली आहे. कोकिळेची कुहूकुहू, पक्षांचा किलबिलाट, मधमाश्यांची गुणगुण याने आसमंत घुमू लागला आहे. पळस, काटेसावर, पांगारा, करपा अशा विविध फुलांनी डोंगरदऱ्या रंगून गेल्या आहेत. त्यात बहुउपयोगी असलेला पळस सर्वांचे लक्ष वेधून घेतो. पळसाच्या पानाच्या पत्रावळी बनवतात, पळसाची वाळलेली फुले पाण्यात भिजून उतरलेला रंग कपडे रंगवण्यासाठी वापरतात, सालीचा उपयोग कातडी कमावण्यासाठी करतात, बियांचे तेलही काढतात.
पळसाबरोबरच लालभडक काटेसावरीची फुले जंगलात प्रत्येकाचे लक्ष आकर्षित करून घेत आहेत. सावरीच्या झाडाची पाने गळल्यानंतर टपोऱ्या कळ््या तयार होतात व याचे रूपांतर हाताच्या विताएवढ्या आकाराच्या फुलांमध्ये होते. या फुलांच्या तळाशी भरपूर पुष्परस असतो. त्यामुळे पक्षी, कीटक, मधमाश्या या झाडाला झोंबलेले असतात. फुले ताजी असतानाच खाली गळून पडतात व गळलेली फुले जंगली प्राणी खातात. फुले गळल्यानंतर बोंडे तयार होतात. हिरवी बोंडे तपकिरी होऊन उकलतात व त्यातून पांढरा कापूस निघतो. हा कापूस वाऱ्यावर उडताना ‘हिमवृष्टी’ होत असल्याचा भास होतो.
पांगारा झाडाचा डेरेदार वृक्ष फुललेला असताना सगळ््यांचे लक्ष वेधून घेतो. पूर्ण फुलांनी भरलेले हे झाड जंगलामध्ये लांबून ज्वाळांचा भास देणारे, रंग भरणारे वाटते. उभ्या तिरप्या काटेरी फांद्यांवर खालून वर उमलत गेलेले दोन ते तीन फुलांचे गुच्छ लागलेले असतात. या फुलांमध्ये पाणी भरलेले असते व हे पाणी पक्षी उन्हाळ््यात पिण्यासाठी वापरतात. फुलांचा बहर संपत आल्यावर शेंगा येतात.
सह्याद्रीच्या पर्वतरांगा अशा विविध फुलांनी रंगून गेल्या आहेत. शहराबाहेर पडल्यानंतर काही ठिकाणी हे वृक्ष दिसतात; परंतु याचे खरे सौंदर्य पाहण्यासाठी जंगलाकडेच जावे लागते.