सुदाम मुंडेने तपासलेल्या दोघींचा गर्भ खाली; पुणे, हैदराबादच्या महिला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 01:04 AM2020-09-13T01:04:33+5:302020-09-13T01:04:55+5:30
डॉ.सुदाम मुंडेला १० वर्षांची शिक्षा लागली होती. न्यायालयाने जामिनावर सोडताच त्याने परळीजवळच असलेल्या रामनगर परिसरात आपले दुकान पुन्हा थाटले.
- सोमनाथ खताळ
बीड : परळी येथील गर्भपात प्रकरणातील मुख्य आरोपी सुदाम मुंडे याने जामिनावर येताच पुन्हा दवाखाना सुरू केला. यात त्याने तीन महिलांची तपासणी केली होती. यातील दोघींचा गर्भ खाली झाल्याची धक्कादायक माहिती आरोग्य विभागाच्या प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे. या दोन्ही महिला पुणे व हैदराबादच्या रहिवाशी असून त्यांचे माहेर परळी आहे.
डॉ.सुदाम मुंडेला १० वर्षांची शिक्षा लागली होती. न्यायालयाने जामिनावर सोडताच त्याने परळीजवळच असलेल्या रामनगर परिसरात आपले दुकान पुन्हा थाटले. ही माहिती मिळताच प्रशासन व आरोग्य विभागाने ५ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास त्याच्या रुग्णालयावर छापा मारला. त्याच्यावर परळी शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
सध्या तो पोलीस कोठडीत आहे. त्याने तपासलेल्या रुग्णांची सोनोग्राफी परळीतीलच एका केंद्रावर झाल्या होत्या. ८ लोकांची नावे आरोग्य विभागाला प्राप्त झाली होती. यातील तीन महिला गर्भवती होत्या. आरोग्य विभागाकडून त्यांची चौकशी करण्यात आली.
यात या महिला, पुणे, परळी व हैदराबाद येथील रहिवाशी असल्याचे समजले. यातील हैदराबाद व पुण्यातील महिलेचा गर्भपात झाला असल्याची माहिती परळीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.लक्ष्मण मोरे यांनी दिली.
महिलांनी याची कारणे वेगवेगळी दिली असली तरी ते संशयास्पद असल्याचे सूत्रांनी सांगितले.