शाळांच्या नुकसानीची माहिती देण्यासाठी दिले काही तास, पुरग्रस्तानंतर आता शाळांची सरकारकडून थट्टा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 05:24 AM2019-08-11T05:24:52+5:302019-08-11T05:25:07+5:30
राज्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरस्थितीमुळे अनेक जिल्हे सध्या पाण्याखाली आहेत. मुंबई आणि परिसरातही काही दिवसांपूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.
मुंबई: राज्यामध्ये अतिवृष्टी आणि पुरस्थितीमुळे अनेक जिल्हे सध्या पाण्याखाली आहेत. मुंबई आणि परिसरातही काही दिवसांपूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर शाळांचे नुकसान झाले असण्याची शक्यता असून सदर नुकसानाची माहिती शिक्षण निरीक्षकांनी मुखाध्यापकांकडून मागवली आहे.
विशेष म्हणजे शनिवारी या संबंधित परिपत्रक काढले असून मुख्याध्यापकांना संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ही माहिती वॉर्ड अधिकाऱ्यांकडे सादर करण्याचे निर्देश मुख्याध्यापकांना दिले असल्याने मुख्याध्यापकच गोंधळल्याची परिस्थिती निर्माण झाली.
मागच्याच आठवड्यात राज्यातील इतर भागांप्रमाणे मुंबईतही अतिवृष्टी झाल्याने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. पावसाचा जोर इतका जास्त होता की यामध्ये काही शाळांचे नुकसान झाल्याची ही शक्यता आहे. त्यामुळे शहरातील सर्व अनुदानित / विना अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांकडून अशा नुकसानाची माहिती गोळा करून देण्याचे निर्देश शिक्षण निरीक्षकांनी मुख्याध्यापकांना शनिवारी दिले. मात्र ही माहिती गोळा कारण्यासाठी त्यांना अवघ्या काही तासांचाच कालावधी देण्यात आला. या वेळेत जर शाळांचे नुकसान झालेच असेल तर माहिती विस्तृत रूपात कशी द्यावी असा प्रश्न मुख्याध्यापकांपुढे उभा राहिला. प्रपत्रात जरी नुकसानीचा प्रकार आणि त्यासाठी आवश्यक दुरुस्तीसाठी अनुदानाची रक्कम भरायची असली तरी त्यासाठी जुजबी माहिती गोळा करून देणे आवश्यक असल्याचे मत काही मुख्याध्यापकांनी व्यक्त केले. त्यामुळे इतक्या कमी वेळात माहिती कशी द्यावी हा पेच मुख्यध्यापकांपुढे उभा राहिला आहे.
यासाठी गुगल फॉर्मची एक लिंक तयार करण्यात आली आहे. ही माहिती दिल्यानंतर ही ती मदत मिळेल की नाही याबाबतही मुख्याध्यापकांनी सवाल उपस्थित केला आहे. माहिती मागवली जाते मात्र शासन काही मदत देत नसल्याची प्रतिक्रिया मुख्याध्यापक संघटनेचे मुंबई सचिव प्रशांत रेडीज यांनी दिली.