मनातील सच्चेपण प्रकट करणारे काही क्षण...

By admin | Published: August 8, 2014 01:07 AM2014-08-08T01:07:57+5:302014-08-08T01:07:57+5:30

तुमच्यावर निसर्गाने अन्याय केला. जन्मत:च आयुष्य संकट वाटावे, असेच तुमच्याबाबतीत घडले. पण निसर्गाने निर्माण केलेल्या अडथळ्यांवर मात करीत तुम्ही कुणाचीही सहानुभूती न घेता

A few moments of manifesting true love ... | मनातील सच्चेपण प्रकट करणारे काही क्षण...

मनातील सच्चेपण प्रकट करणारे काही क्षण...

Next

विजय दर्डा : अंध मुलांशी भावपूर्ण संवाद
नागपूर : तुमच्यावर निसर्गाने अन्याय केला. जन्मत:च आयुष्य संकट वाटावे, असेच तुमच्याबाबतीत घडले. पण निसर्गाने निर्माण केलेल्या अडथळ्यांवर मात करीत तुम्ही कुणाचीही सहानुभूती न घेता इथपर्यंतचा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला. ही बाब मला स्वत:ला ऊर्जा देणारी आणि जगण्याचे सकारात्मक बळही देणारी आहे, अशा भावपूर्ण शब्दात खा. विजय दर्डा यांनी आज अंध मुलांशी संवाद साधला.
मनातील सच्चेपण प्रकट करणारे हे क्षण अनुभवताना ही मुलेही भारावली. याप्रसंगी ‘सर...! तुम्ही नेहमीच येथे येत रहा. कारण तुमच्याशी संवाद साधल्यावर आम्हालाही आनंद होतो’, अशा शब्दात त्यांनी आपली भावना व्यक्त केली. या भारावलेल्या क्षणाचे निमित्त होते लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन आणि खा. विजय दर्डा यांनी अंध विद्यालयाला दिलेल्या भेटीचे. गुरुवारी दुपारी खा. दर्डा यांनी दक्षिण अंबाझरी मार्गावरील ब्लार्इंड रिलिफ असोसिएशन अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या अंध विद्यालयाला सदिच्छा भेट दिली. तब्बल दोन तास खा. दर्डा यांनी अंध मुलांशी संवाद साधला. त्यांनी या मुलांशी मनमोकळा संवाद साधला आणि त्यांचे प्रश्न समजून घेतले. मुलांनीही त्यांना अनेक प्रश्न विचारून आपले समाधान करून घेतले. भरपूर गप्पांमध्ये मुलांना वेळ कसा गेला, ते कळलेच नाही. याप्रसंगी मुलांना संबोधित करताना खा. दर्डा म्हणाले, एखाद्या धार्मिक स्थळी गेल्यावर मनाला जी उभारी आणि प्रसन्नता लाभते. तसाच प्रसन्न अनुभव मला येथे आला. कुणाच्या सहानुभूतीची आणि मेहरबानीची अपेक्षा न ठेवता समोर आलेल्या प्रत्येक संकटावर मात करीत तुम्ही स्वावलंबी होण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न करीत आहात, यालाच खरे जीवन म्हणतात. हे जीवनशिक्षण तुम्हाला या विद्यालयात मिळते आहे, याचेही मला समाधान वाटते. तुम्ही अंध असलात तरी समाजाला दृष्टी देण्याचे सामर्थ्य वादातीत तुमच्याकडे आहे. तुमच्या चेहऱ्यावरचे हास्य आयुष्यातल्या कुठल्याही संकटात अविचल राहण्याचे बळ देणारे आहे. तुमच्या हातांचा स्पर्श माझ्या संवेदनांना जिवंत करणारा आहे. असे बरेच संचित मी येथून घेऊन जातोय. हे अनुभव मला समृद्ध करणारे आहेत, असे खा. दर्डा म्हणाले.
या स्नेहसंवादाच्या प्रारंभी मुलांनी स्वागतगीताने खा. दर्डा यांचे स्वागत केले. तर या सोहळ्याचा समारोप ‘हम को मन की शक्ती दे ना...’ या प्रार्थना गीताने करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष निखिल मुंडले, सचिव नागेश कानगो, सहसचिव मीनाक्षी ठोंबरे, मकरंद पांढरीपांडे, मैत्री परिवार संस्थेचे कार्यकर्ते चंदू पेंडके प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डी. एल. मेश्राम, संचालन कांचन नाजपांडे आणि आभार राजेंद्र हाडके यांनी मानले. (प्रतिनिधी)
दिवंगत ज्योत्स्ना दर्डा यांच्या आठवणींचा गहिवर
याप्रसंगी अंध विद्यालयातील मुलांनी ज्योत्स्ना भाभींची आवर्जून आठवण काढली. चार वर्षांपूर्वी चिटणीस पार्क महाल येथे लोकमत बालविकास मंचच्यावतीने लिटिल चॅम्प या बालगायकांच्या गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम पाहण्याची इच्छा अंध विद्यालयातील मुलांनी व्यक्त केली होती. या मुलांची इच्छा दिवंगत ज्योत्स्ना दर्डा यांच्या कानावर आली. त्यांनी त्वरित पुढाकार घेऊन शंभर अंध मुलांच्या येण्याजाण्याची व्यवस्था करून त्यांची कार्यक्रमात येण्याची इच्छा पूर्ण केली होती. यासाठी कार्यक्रमात या मुलांसाठी त्यांनी विशेष सोय केली आणि लिटिल चॅम्पस् सोबत त्यांची भेटही घडवून आणली. कार्यक्रमात काही अंध मुलांनी काही गीतांवर नृत्यही सादर केले होते. यानंतर अंध मुलांसाठी ज्योत्स्नाभाभींनी नाश्त्याचीही सोय केली. दिवंगत ज्योत्स्ना दर्डा यांच्या आठवणींनी मुलांना गहिवरून आले. या मुलांनी ही आठवण सांगताच खा. दर्डा यांचेही डोळे पाणावले.

Web Title: A few moments of manifesting true love ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.